धानाला हजार रूपयांची भाववाढ द्या-राष्ट्रवादी कॉंग्रेस

0
10

विविध मागण्यांचा समावेश, तहसीलदारांना दिले निवेदन

सालेकसा,दि.16 : धानाला प्रती क्विंटल एक हजार रूपये भाववाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओबीसी आघाडी व किसान आघाडी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असा इशारा दिला आहे.
मागण्यांमध्ये सरकारी धान खरेदी केंद्र तत्काळ सुरु करावे, विक्री केलेल्या धानाचा मोबदला आठ दिवसांत देण्यात यावा, धानाची आधारभूत किंमत प्रती क्विंटल एक हजार रुपयांनी वाढविण्यात यावी, धानावर प्रती हेक्टर बिन व्याजी ५0 हजार रुपये कृषी कर्ज देण्यात यावे, शेतकर्‍यांना प्रती हेक्टर ३0 हजार रुपये मदत देण्यात यावी, केंद्र सरकार जुलमी कायदा भू- संपादन बील रद्द करण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांची नान क्रिमिलेयर र्मयादा ९ लाख करुन ओबीसी वरील अन्यायकारक महाराष्ट्र सरकारचा आदेश रद्द करण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे.
सध्या रबी धान पिकाची कापणी व मळणी जोमात सुरु आहे. धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे व जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, तालुकाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे, रामेश्‍वर पंधरे, ओमप्रकाश पारधी, बिसरात चज्रे, अभिषेक चुटे, कैलाश धामडे, महेंद्र कुराटे, मनीष पुराम, पप्पू राणे, निर्दोष साखरे, मनोज शरणागत, दौलत अग्रवाल यांचा समावेश आहे. (वार्ताहर) तहसीलदारांना निवेदन देताना राष्ट्रवादी कांँग्रेसचे पदाधिकारी.