‘आदर्श ग्राम’साठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

0
14

भंडारा ता.२3: आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन गावामध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देईलच पण खर्‍या अथार्ने मॉडेल गाव करण्यासाठी गावातील लोकांचा संपूर्ण सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केले.
सांसद आदर्श ग्राम योजनेची गाव विकास आराखडा कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात घेण्यात आली. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे आणि राज्यस्तरीय प्रशिक्षक ए.आर. शेख उपस्थित होते.
या गावात भौतिक सुविधांसोबतच गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक, आर्थिक विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा. गावात अन्नधान्य वितरण करण्यासाठी बायोमेट्रिक पध्दती सुरु करावी. त्यासाठी गावात बायोमेट्रिक मशीन देण्यात येईल. गावातील सर्व कुटुंबांचे रजिस्ट्रेशन करुन घ्यावे. गावात सामाजिक न्यायाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच लोकांचे बँकेत खाते उघडून पंतप्रधान विमा योजनेचा लाभ गावातील लोकांना द्यावा. यासाठी बँकेने गावात कॅम्प आयोजित करावा. गावातील १४ कुपोषित मुले कशामुळे कुपोषित आहेत याची कारणे शोधून मुलांवर तातडीने उपाय योजना करावी, गावातील प्रत्येक व्यक्तीचे हेल्थ कार्ड तयार करावे,असे निर्देश त्यांनी दिलेत.
गावातील ११४ कुटुंबांना वीज जोडणी नाही. यासाठी वीज वितरण कंपनीने गावात कॅम्प घेऊन सर्वांचे अर्ज भरुन घ्यावेत आणि वीज जोडणी करुन द्यावी. कंपोस्ट खत प्रकल्प आणि शोष खड्डे तयार करुन गावात स्वच्छता राखली जाईल यांची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. याबाबत गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी.
अंगणवाडी आणि शाळेमध्ये शौचालय आणि पाण्याची व्यवस्था असावी. तसेच सर्व कुटुंबीयांकडे शौचालय बांधकाम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, चार्ज ऑफिसर तथा तुमसर गटविकास अधिकारी स्नेहा कुचळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.