माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीला वेग

0
8

गोंदिया दि.२९–: गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे तलावांचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. मालगुजार लोकांनी श्रमदान, लोकवर्गणी व लोकसहभागातून सुमारे सहा हजार तलावांचे बांधकाम केले. यात कोहळी जातीचा विशेष सहभाग होता. परंतु कालांतराने त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले. मात्र खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारामुळे या तलावांमधून मागील तीन वर्षांपासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

माजी मालगुजारी तलावांपासून महसूल मिळत नसल्याने शासन त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे या तलावांचे रपटे जीर्ण होवून सिंचन क्षमता कमी होवू लागली. ही बाब प्रफुल्ल पटेल मंत्री असताना तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर तत्कालीन आघाडी सरकारने मामा तलावांच्या विशेष दुरूस्तीसाठी यांत्रिकी विभागातील लिपर शेलरद्वारे या तलावांचे गाळ काढण्याचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू केले आहे. तत्कालीन सरकारने विशेष दुरूस्तीसाठी राज्य शासन १० टक्के व केंद्र शासनाने ९० टक्के निधी देवून काम सुरू केले.

काही तलावांचा गाळ काढण्यात आल्याने त्यांची सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांच्या शेताला अधिक पाणी मिळत आहे. यात काही तलावांचे काम सुरू असून काही तलावांच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाल्याने तत्कालीन आघाडी सरकार व खा.प्रफुल्ल पटेल यांचे शेतकऱ्यांनी आभार मानल असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्ष जीवन लंजे यांनी कळविले.

कोसबी तलावाचे ५६.४९ लाख रूपयांच्या खर्चातून गाळ काढणे व विशेष दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. चिरचाडी येथे ४२.५३ लाख रूपयांच्या खर्चातून गाळ काढणे व विशेष दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. माहुली व खैरी तलावांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर बोपाबोडी व पळसगाव-राका येथील तलावांच्या विशेष दुरूस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच कोसमतोंडी, खाडीपार, सौंदड, मालीजुंगा, पुतळी व खोडशिवनी येथील तलावांच्या विशेष दुरूस्तीचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. ही कामेसुद्धा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल, मनोहर चंद्रिकापुरे, जीवन लंजे, गजानन परशुरामकर, मुकेश अग्रवाल, अविनाश काशिवार, रूपविलास कुरसुंगे, किरण गावराने, मुन्ना मरस्कोल्हे, नरेश भेंडारकर, मोहन खोटेले, देवराम डोये, भानुदास डोये, मधू हर्षे, चिंतामन ब्राह्मणकर, शिवाजी गहाणे, गंगाधर परशुरामकर, युवराज वालदे, सुभाष कापगते, मिलनदास राऊत, आत्माराम कापगते, कृष्णा ठलाल, चंद्रकांत बहेकार, डॉ. वाढई, भोला कापगते, के.बी. परशुरामकर, अशोक लंजे, उषा मुनेश्वर, ईश्वर लंजे, भागवत कापगते आदी प्रयत्नशील असून कार्यकारी अभियंता सहकार्य करीत आहेत.