परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याचे आवाहन

0
161

वाशिम, दि. १६ : राज्यात विविध ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून २० फेब्रुवारीनंतर परदेशातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे अशा नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास तातडीने कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या नावांबाबत गुप्तता पाळण्यात येणार आहे.

 महाराष्ट्रात ‘कोरोना’चा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक सज्जता केली आहे. चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दुबई, सौदी अरेबिया व अमेरिका या देशांमधून प्रवास केलेल्या नागरिकांची १०० टक्के आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीनंतर परदेशातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी.

परदेशातून आलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसह सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी ही आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशातून आलेल्या नागरिकाचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता इत्यादी माहिती ८३७९९२९४१५ या व्हॉटसअप क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर पाठवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.