वाशिम जिल्ह्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळे बंद ठेवावीत

* विश्वस्त, पुजारी यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन * 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक

0
122
वाशिम, दि. १६ : सद्यस्थितीत जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास इतर व्यक्तींना या विषाणूचा संसर्ग होत असल्याने गर्दी होणारे टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांचे अध्यक्ष, विश्वस्त, पुजारी यांनी आपली धार्मिक स्थळे बंद ठेवावीत व गर्दी टाळून स्वतः पूजा अर्चा करावी, असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण हे एका रुग्णाकडून संपर्कात येणाऱ्या अन्य व्यक्तीस होते. त्यामुळे लोकांनी एकत्र येणे टाळणे, हा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एकमेव उपाय आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी व देवस्थान, मस्जिद, दर्गा, प्रार्थनास्थळे यांचे अध्यक्ष, विश्वस्त, पुजारी यांनी सुद्धा आपली देवस्थान, मस्जिद, दर्गा, प्रार्थनास्थळे बंद ठेवून स्वतः पूजा अर्चा करावी. जेणेकरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.