26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ रुग्णालय क्वारंटाईनमधून 119 व्यक्तींना डिस्चार्ज;192 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

रुग्णालय क्वारंटाईनमधून 119 व्यक्तींना डिस्चार्ज;192 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

* मुंबई, पुणे व अन्य राज्यातून आलेल्या व्यक्तींची संख्या 22 हजार 930 * 12626 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन पूर्ण

0
289

भंडारा, दि. 21 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून आतापर्यंत 119 व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 225 व्यक्तींचे घशातील नमुने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो), नागपूर येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी 192 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. परदेशातून एकही व्यक्ती जिल्ह्यात आली नसून 35 व्यक्ती रुग्णालय अलगीकरण कक्षात आहे तर आयसोलेशन वार्डमध्ये 23 व्यक्ती भरती आहेत. .

1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या 22 हजार 930 आहेत. यापैकी 12 हजार 626 व्यक्तींचा 28 दिवसांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. 10304 व्यक्तींना गृह विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत.  भंडारा जिल्ह्यामध्ये आजपावेतो एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. तरीसुद्धा शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. भंडारा जिल्ह्यामधील 9 शासकीय वसतिगृहामध्ये विस्थापित  तसेच मजूर यांच्यासाठी निवारागृह करण्यात आले आहे. या ठिकाणी भोजन, वैद्यकीय तपासणी, योगा व समुपदेशनाची व्यवस्था आहे.

 जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या नेतृत्त्वात जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना आखत असून वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळून जीवनावश्यक व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोशल डिस्टंसिंगची मार्किंग करण्याचे कार्य सुरु आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन कोरोनाला आळा घालण्यासाठी “ मीच माझा रक्षक ” या संदेशाचे पालन करावे.

सर्व   सहवासितांना प्राऊड टू प्रोटेक्ट भंडारा होम क्वारंटाईन हे स्टॅम्प मारण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष दोन तयार करण्यात आले असून जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 07184-251222 व जिल्हा सामान्य रुग्णालय -क्रमांक 07184-252247 आणि  आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा क्रमांक 07184-252317 यावर संपर्क साधावा.