अर्जुनी मोरगाव जीडीसीसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप गप्प का?

0
20

गोंदिया,दि.१०- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अर्जुनी मोरगाव शाखेत गेल्या दोन वर्षापूर्वी उघडकीस आलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी आजही कुणावरही प्रशासनात्मक कारवाई झालेली नाही.पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल होऊन काहींनी अटक करण्यात आले होते.त्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी सुध्दा सुनावली होती.त्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप होते,ते आज तुरुगांतून बाहेर आलेले आहेत. अद्यापही त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही हे वास्तव असले तरी विद्यमान भाजप सेना युतीच्या सरकारमधील एका मंत्र्याच्या खास जवळचा कंत्राटदार त्याप्रकरणात अडकलेला होता.
आज तोच कंत्राटदार त्या मंत्र्याच्या निधीतील सर्व कामे स्वतःकरतो यावरून मंत्री आणि कंत्राटदाराचे किती चांगले संबध असतील याबद्दल न बोललेच बरे.परंतु विरोधात असताना मध्यवर्ती बँकेच्या या कोट्यावधी रुपयाच्या घोटाळ्यावर भाजपचे आमदार का गप्प बसले होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे.कारण मध्यवर्ती बँकेवर सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची होती.त्यामुळे भाजपच्या आमदारांनी याप्रकरणी या मुद्याला धार देत शासन दरबारी लावून धरून बँकेवर प्रशासक नेमण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता.परंतु तसे केले नाही यावरून भाजपचेही कुठे तरी या बँक घोटाळ्यात हात गुंतले तर नसावे ना या कुशंकाना वाव मिळत आहे.
फक्त तत्कालीन तिरोड्याचे आमदार डॉ.खुशाल बोपचे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून बँकेची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्तीची मागणी केली होती.त्यानंतर मात्र कुठल्याही नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
अर्जुनी मोरगाव बँकेचा घोटाळा हा संचालक मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे नसल्याने संचालक मंडळ बरखास्त करण्याचा प्रश्न येत नसल्याचे काही संचालकांचे म्हणणे आहे.हा घोटाळा अधिकारी,कर्मचारी व बाहेरच्या व्यक्तींनी संगनमताने केलेला आहे.त्यामुळे त्यांचीच सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.या शाखेतील घोटाळा १२ कोटी रुपयाच्या वर गेलेला असून ऑडिटमध्ये सुध्दा नोंद करण्यात आली आहे.एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा आणि त्याचा वापर करणारे या सर्वांची राजकीय,आर्थिक बाजू तपासणे सुध्दा महत्त्वाचे आहे.
सुरवातीला १ कोटी ९४ लाख रुपयाच्या घोटाळ्याची तक्रार नोंदवून याप्रकरणात तत्कालीन शाखा व्यवस्थापक,रोखपाल,लेखापाल व तीन कर्मचाèयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतु पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरविण्यास सुरवात केली तेव्हा मात्र त्यात विद्यमान सरकारमधील सहभागी असलेल्या एका पक्षाच्या हितqचतक कंत्राटदाराचे नाव पुढे आले आणि त्यावेळी विरोधात असलेला आजचा सत्ताधारी पक्ष पूर्णपणे गारद झाला.त्यामुळेच की काय भाजप या घोटाळ्याप्रकरणी खुलेआम जनतेसमोर येण्यास घाबरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.