गोंदिया दि.25( जिमाका)– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.या कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांना त्यांचे बँकाबाबतचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व बँकेतील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत स्तरावरील शासन मान्यताप्राप्त ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशाद्वारे अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.
ग्राहक सेवा केंद्रामध्ये नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देतांना शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे या केंद्राने पालन करावे.यामध्ये केंद्र चालक व आपरेटर यांचे करिता दोन मास्क असावेत. या सुविधा केंद्रात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकरिता सॅनिटायझर, हात धुण्यासाठी पाणी,साबण व हॅन्ड वॉशची सुविधा उपलब्ध करावी. नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याकरिता केंद्राच्या बाहेर दोन मीटर अंतरावर चौकोन आखण्यात यावे.
शासनाच्या सूचना व आदेशाचे केंद्रचालकांनी काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती आणि शासन मान्यताप्राप्त ग्राहक सेवा केंद्राच्या चालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल.असे आदेशात नमूद केले आहे





