गोंदिया,दि.30 : कोरोना विषाणू संसर्गाची खबरदारी म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. या कालावधीत सर्व कामधंदे ठप्प पडले असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात गोंदिया जिल्हाचा सुद्धा समावेश आहे. मात्र नागरिकांना होणार्या व असुविधा व देशाची आर्थिक परिस्थिती बघता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांना तीन वर्गवारीत विभागले गेले आहे. त्यात रेड, ऑरेज आणि ग्रीन अशा विभागांचा समावेश आहे. सध्या गोंदिया जिल्हा ग्रीन झोन अंतर्गत मोडला जात आहे. सुरुवातीला गोंदिया जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. परंतु उपचारादरम्यान सदर रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने गोंदिया जिल्हा सध्या ग्रीन झोन अंतर्गत मोडला गेला आहे. शासनाच्या निर्णयानुसार ग्रीन झोन मध्ये असणार्या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करून विविध व्यवसायांना व उद्योगांना सुरू करण्याची मंजुरी दिलेली आहे. त्यात मनरेगा अंतर्गत येत असलेल्या कामांना व शेती उपयोगी व्यवसायांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश आ.विनोद अग्रवाल यांनी पंचायत समितीत सभा घेवून संबधित अधिकार्यांना दिलेत.
जिल्ह्यातील परिस्थिती आणि रोजगाराच्या समस्यांना घेवून आ.विनोद अग्रवाल यांनी पंचायत समिती गोंदिया येथे गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांची भेट घेवून प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. मनरेगा अंतर्गत घरकुलचे कामे व जलसंधारणाच्या कामाला तसेच शेती उपयोगी उद्योगधंद्यांना तात्काळ सुरू करण्यात यावे, मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाचे योजना, जनावरांचे गोठा बांधकाम, भातकचार, नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण अशा विविध कामे योजनेनुरूप सुरू करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सुचना आ.विनोद अग्रवाल यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यातील बरेचसे कामगार बेरोजगार असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली असून दैनंदिन गरजा पूर्ण करणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे शासनावर त्याचा भार सुद्धा पडत आहे. यावर उपाय म्हणून मनरेगा अंतर्गत कामाला तात्काळ सुरू करून त्याने कामगारांना कामे उपलब्ध करून दिल्यास शासनावर चा अधिक भार कमी होऊन स्थानिकांना रोजगारातून आर्थिक लाभ सुद्धा होईल, तेंदुपत्ता संकलन, मोहफूल संकलन, विटभट्टा, शेतीसाठी लागणारे साहित्यांचे व बियाणे व खते यांची दुकाने यांचाही समावेश केला आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कामगार वर्ग असून, रोजगारातूनच त्यांची उपजीविका चालत असल्याने लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका कामगार वर्गाला पडलेला आहे. म्हणून रोजगाराचे साधन तात्काळ उपलब्ध करण्यात यावे, असेही आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकार्यांना निर्देश देताना व्यक्त केले. मनरेगाचे काम सुरू असताना कामगारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच कामे करावे, असेही यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी सुचवले.





