भंडारा,दि.04 : ऑरेज झोनसाठी शासनाने काही सवलत जाहीर केल्यानंतर सोमवारी भंडारा शहरातील रस्त्यावर नागरिक आणि वाहनांची मोठी गर्दी झाली. जिल्हा प्रशासनाचे आदेश नसताना अनेक दुकाने सकाळी १० वाजतापासून उघडली.तर जिल्ह्यातील दारुची दुकानावर मात्र अद्यापही संचारबंदी कायम राहिल्याने तळीरामांच्या इच्छावर पाणी फेरले गेले. यामुळे शहरात मोठा संभ्रम दिसत होता.भंडारा जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्याने जिल्हा ऑरेज झोनमध्ये आहे. त्यातच शासनाने ग्रीन व ऑरेज झोन साठी सवलती जाहीर केल्या. मात्र स्थानिक प्रशासनाने आज सोमवारला आदेश काढण्यापुर्वीच नागरिकांनी गर्दी केली,तेव्हा कुठे दुपारी आदेश निघाला. गत ४० दिवसापासून लॉकडाऊन असलेले नागरिक सोमवारी थेट बाजारात उतरले. शहरातील मोठा बाजार, गांधी चौक ते बसस्थानक मार्गावरील मुख्य बाजारपेठ, राजीव गांधी चौक यासह सर्वत्र नागरिकांची गर्दी दिसत आहे. कापड, हार्डवेअर, मोबाईल, बेकरी यासह अनेक दुकाने उघडली गेली. नेमके कोणती दुकाने उघडायची याबाबचे आदेश काढले असून माॅल,शाॅपिंगसेंटर ,दारुदुकाने आदींवर मात्र बंदी कायम ठेवली आहे.





