गोंदिया, दि.४: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाच्या २ मे २०२० रोजीच्या आदेशानुसार जीवनाश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने वगळता इतर परवानगी देण्यात आलेली दुकाने, आस्थापना दर बुधवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज, ४ मे रोजी दिले आहेत.विशेष म्हणजे दारूची दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित होईपर्यंत बंद असतील असे म्हटले आहे.
भविष्यात गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणत्याही भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आल्यास, अशा रुग्णांच्या संख्येच्या आधारावर जिल्ह्याची जोखीम निश्चित करण्यात येईल व नव्याने झोन पाडण्यात येतील. एखाद्या ठराविक भागात विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आल्यास त्या ठराविक भागासाठी वेगळा झोन निश्चित करण्यात येईल. अशा परिस्थितीत जोखमीच्या आधारावर दिलेली सूट प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रद्द करण्यात येईल व नव्याने सूचना निर्गमित करण्यात येतील.
या आदेशानुसार जिल्ह्यात खालील सेवा प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत –
१. सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहणार असून कोणत्याही रेल्वेने प्रवाशी वाहतूक करता येणार नाही.
२. अधिकृत परवानगीशिवाय परराज्यातून गोंदिया जिल्ह्यात व गोंदिया जिल्ह्यातून परराज्यात प्रवासाच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी असेल.
३. आंतरराज्य व आंतरजिल्हाकरिता परवानगी शिवाय खाजगी प्रवासी वाहतुकीची सर्व साधने बसेस इत्यादी बंद राहतील.
४. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील.
५. आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी वगळता इतर सर्व व्यक्तींसाठी आदरातिथ्याची सेवा पूर्णपणे बंद राहील. सदरचा मुद्द्दा अडकलेल्या व्यक्तींसाठी, प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी लागू राहणार नाही.
६. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील.
७. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मेळावे यावर पूर्णपणे बंदी राहील.
८. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत.
९. केश कर्तनालय, ब्युटीपार्लर, स्पा, चहाच्या टपऱ्या, ज्यूस सेंटर, पानटपऱ्या, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट येथे इन हाऊस डायनिंग व ढाबे पूर्णपणे बंद राहतील. मात्र, राज्य महामार्गावरील (नॅशनल हायवे) ढाबे अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरु राहतील.
१०. दारूची दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. मात्र, असे आदेश निर्गमित होईपर्यंत दारूची विक्री करणारी दुकाने बंद राहणार आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यात खालील सेवा विहित कालावधीत सुरु राहतील –
१. अत्यावश्यक सेवांची दुकाने यापूर्वी दिलेल्या परवानगीनुसार दररोज सुरु राहतील. मात्र, उपरोक्त प्रतिबंधित सेवा, दुकाने, आस्थापना वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना दर बुधवार, गुरुवार व शुक्रवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. त्यासाठी पासेस देण्याची गरज नाही.
२. एम.आय.डी.सी. क्षेत्रातील व इतर भागातील उद्योगधंदे सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. या सर्व उद्योगांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पास बंधनकारक राहील.
३. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी राहील. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व मास्क वापरणे इत्यादी सुरक्षिततेच्या निर्देशांचे पालन करणे अत्यावश्यक राहील.
४. लग्न समारंभासाठी परवानगी बद्दल मुख्यालय तालुक्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा ज्या तालुक्यात उपविभागीय कार्यालय नसेल त्या तालुक्यात संबंधित तहसीलदार हे परवानगी देतील. तसेच परवानगीमध्ये नमूद अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी याबाबत आपल्या स्तरावरून स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत.
५. वैद्यकीय सेवा (मेडिकलची दुकाने धरून) २४ तास सुरु राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय व बँक अधिकारी, कर्मचारी यांना ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहणार आहे.
सोशल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग करणे बंधनकारक
परवानगी दिलेल्या आस्थापना, दुकाने याठिकाणी सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे आवश्यक असून याकरिता आस्थापना, दुकानासमोर सहा फुटाच्या अंतराने मार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारक, दुकानदार यांची राहील. तसेच यामध्ये सेवा देताना मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक राहील. दुकानामध्ये अथवा आस्थापनामध्ये एकाचवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची खबरदारी दुकानदार, आस्थापनाधारकाने घेणे आवश्यक आहे.





