गोंदिया,दि. 5 :–जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दक्ष राहून विविध प्रकारच्या उपाययोजना करीत असल्यामुळेच गेल्या २५ दिवसात नवीन रुग्ण न आढळल्यानेच जिल्हा ग्रीन झोनमध्ये आलेला आहे.परंतु शेजारील छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथे जिल्ह्यातील गर्रा निवासी असलेला युवक हा पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या नात्यातील व संपर्कात आलेल्या ३२ जणांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.त्यामुळे या ३२ जणांच्या अहवालाकडे सुध्दा जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.सध्याच्या घडीला जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे.
सावधगिरीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात येणाèया नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.काही व्यक्तींना घरीच तर काहींना शासकीय संस्थांमध्ये अलगीकरणात ठेवण्यात येत आहे.संशयित व्यक्तीच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले गेलेत.त्यातच गोंदिया तालुक्यातील गर्रा येथील ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या गावात आवश्यक त्या निर्देशानुसार तपासणी मोहिम सुरु केली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २८८ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी २४२ व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाले.यामध्ये २४१ नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.तर १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेला होता,तो आता निगेटिव्ह झालेला आहे.
५ मे रोजी २९ व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर एकूण ४६ स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सात संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ९६ व्यक्ती उपचार घेत आहेत.यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल-४६,एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज,गोंदिया -१७, चांदोरी-७ ,लिटिल बर्ड कॉन्व्हेंट,नगर परिषद तिरोडा – ५, समाज कल्याण निवासी शाळा,डव्वा – ६,शासकीय आश्रमशाळा इळदा -१० आणि बिरसी उपकेंद्र येथे ५ अशा एकूण ९६ व्यक्तींचा समावेश आहे.जिल्ह्यात २५ दिवसाच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.त्यामुळे केंद्र सरकारने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे.राज्यात केवळ सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये असून त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग व पोलीस विभागाने जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलल्यामुळे कोरोनाचा विस्तार झालेला नाही.
जिल्ह्यात २५ दिवसात नवीन एकही रुग्ण नाही
२४१ अहवाल निगेटिव्ह,९६ व्यक्ती अलगीकरण केंद्रात





