जि.प.साठी ६५ नामांकन,रविवारीही कामकाज सुरू

0
22

गोंदिया दि.१४: जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह व सर्व आठ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर आॅनलाईन नामांकन प्रक्रियेने वेग घेतला आहे. बुधवारपासून नामांकन दाखल करण्याची मुभा असली तरी शुक्रवारी पहिले नामांकन दाखल झाले. शनिवारी त्यात आणखी भर पडली. दोन दिवसात जिल्हा परिषदेसाठी ६५ तर पंचायत समित्यांसाठी ७१ नामांकन दाखल झाले आहेत.
नामांकन दाखल करण्यासाठी सोमवार दि.१५ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे रविवारीसुद्धा (दि.१४) नामांकन दाखल करून घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे.या निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र यात सुधारणा केली असून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अर्ज केला असेल परंतू नामनिर्देशन भरण्याच्या तारखेला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशा उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमानपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे उमेदवाराचा अर्ज असल्याचा कोणताही पुरावा सादर करावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द करण्यात येणार आहे.