24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये ठेवा– जिल्हाधिकारी

रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये ठेवा– जिल्हाधिकारी

Ø  परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसेसची व्यवस्था Ø  डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक

0
410

भंडारा,दि. 15 :– परदेशातून व रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या नागरिकांची तपासणी करण्यात यावी तसेच प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे प्रदीपचंद्रन यांनी दिले.
या व्यतिरिक्त ग्रीन व ऑरेंज झोन मधून येणाऱ्या नागरिकांमध्ये कोविड १९ च्या अनुषंगाने लक्षणे आढळून आल्यास त्यांना सुध्दा संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

 कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी जिल्हयातील पोलीस अधिकारी, तहसिलदार,  गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची  बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित  करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते,आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके जिल्हा यावेळी उपस्थित होते.

 मध्यप्रदेश जाणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.परराज्यातून किंवा बाहेर ‍जिल्हयातून भंडारा जिल्ह्यात आलेल्या तसेच जाणाऱ्या व्यक्तींसाठी जिल्हयातील चेकपोस्टवर चहापान व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

 तहसिलदार, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी आपसातील समन्वयासाठी सतत बैठका घ्याव्यात,  या माध्यमातून येणाऱ्या अडचणीवर मात करणे सोयीचे होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.  होम क्वारंटाईन या सज्ञेत एक व्यक्ती नसून पूर्ण कुटूंबातील सदस्य असे सर्वेक्षणात ग्राहय धरावे, अशा सूचना त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्या. ग्रामस्तरावर तीव्र स्वासदाह या आजाराचे सर्वेक्षण करण्यात यावे असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की,  सर्वेक्षण योग्य व अचूक करण्यात यावे.

गर्भवती महिला तसेच तीन वर्षाखालील बालकास संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवू नये. त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवावे. शहरी भागात व ग्रामीण भागात बाहेरुन आलेल्यांना तात्काळ क्वारंटाईन करावे. संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था तहसिलदार यांचेवर राहील. इतरांपासून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये याची खबरदारी म्हणून चेकपोस्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी  मास्क, हातमोजे घालणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले
लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांना व कामगारांना व्यवसायापासून तसेच मजुरीपासून वंचित रहावे लागले आहे. अशा परिस्थितीत शासनातर्फे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी ज्या पात्र व्यक्तींकडे रेशन कार्ड नाही त्यांना रेशनकार्ड देण्यात आल्याचे तहसिलदार यांनी सांगितले.

रेशनकार्ड नसणाऱ्या जिल्हयातील सर्व कुटूंबांना तात्काळ धान्याचा पुरवठा करण्यासाठी सर्व तहसिलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी व रेशनकार्ड वितरित करण्यासाठी मोहिम राबवावी असे जिल्हाधिकारी म्हणाले. वयोवृध्द व दिव्यांगांना सुध्दा धान्याचा पुरवठा करण्यासाठी त्यांची यादी तयार करून त्यांना किराणा किट देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिल्या. तहसिलस्तरीय क्वारंटाईन मध्ये कोणत्याही प्रकारे अडचण भासणार नाही याकडे तहसीलदारांनी लक्ष द्यावे असे ते म्हणाले. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आले असले तरी नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात  डिस्टंन्सिगचे पालन करण्याची सवयच लावून घ्यावी, असे ते म्हणाले.

मनरेगामध्ये भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्यामुळे त्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
धान्य पुरवठा, सातबारा वाटप, रेशनकार्ड बांधकाम, लग्न समारंभासाठी परवानगी, दारु विक्री, शहरी भागात दैनंदिन वस्तुचे दुकानाबाबत करण्यात आलेले नियोजन व पासेसबाबत आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सादरीकरण करून 19 प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत नियोजनाबाबत माहिती दिली.