27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ मान्सून पुर्वतयारीचे सुक्ष्म नियोजन करा-डॉ.बलकवडे

मान्सून पुर्वतयारीचे सुक्ष्म नियोजन करा-डॉ.बलकवडे

0
346

गोंदिया दि.16: मान्सून कालावधीत अचानक उदभवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी मान्सून पुर्वतयारीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पुर्वतयारी आढावा बैठक आज 15 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी ,राहूल खांडेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, 1 जूनपासून मान्सूनचा कालावधी सुरू होणार आहे. सर्व विभागांनी नैसर्गीक आपत्तीचे पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये पूर परिस्थितीचे संभाव्य धोके आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाययोजना करण्यासंबंधी सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. धान्य साठा,औषध साठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्यास नैसर्गीक आपत्तीला तोंड देण्यास सोयीस्कर होईल. नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांना त्यांच्या क्षेत्रात असलेल्या नाले, नाली सफाईचे काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजाराची साथ होण्याची शक्यता असते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे निर्जंतूकीकरण करण्यासाठी ब्लीचिंग पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा. तालुका निहाय गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या तयार कराव्यात.पर्जन्यमानाची आकडेवारी सर्व तालुक्यात दररोज सकाळी 8 वाजेपर्यंत अद्यावत करुन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

सभेला सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायत मुख्याधिकारी व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सभेत विषयांचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.