29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ पाच कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी रवाना

पाच कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी रवाना

0
840

गडचिरोली,दि.29ः जिल्ह्यातील पहिल्या पाच कोरोनाबाधित रुग्णांना टाळय़ांच्या गजरात घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आत्तापयर्ंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ एवढी होती. २८ रुग्णांपैकी आज ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला व त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे व इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गुरुवारी बरे झालेल्या रुग्णांपैकी कुरखेडा येथील पहिले चार रुग्ण व चामोर्शी येथील एका रुग्णाचा समावेश होता. हे पाचही रुग्ण आज त्यांच्या त्यांच्या घरी रुग्णवाहिकेने रवाना झाले. त्यांना आता यापुढे सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढील सात दिवस आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरीच त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत. सदर सर्व रुग्ण १८ व १९ मे दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले होते.                                                                                                                           उर्वरित २३ रुग्णांवर उपचार प्रगतिपथावर                                                                          जिल्ह्यातील एकुण २८ पैकी ५ रूग्णांना सोडल्यानंतर उर्वरीत २३ रुग्णांवर दवाखान्यात उपचार प्रगतीपथावर आहेत. यातील सर्व रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असून चांगल्या प्रकारे असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे

कोरोना आजाराशी लढायचं आहे

रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या सर्व रूग्णांना सॅनिटेशन कीट व गृह विलगीकरणाचे कीट सोबत देण्यात आले आहे. त्यांना आता घरी खबरदारी म्हणून सात दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्यांची उपचारादरम्यान रुग्णालयातील सर्व डॉक्टर इतर कर्मचाऱ्यांनी चांगली काळजी घेतली. सर्व नागरिकांनी आता कोरोना रूग्णांबरोबर नाही तर कोरोना आजाराशी लढायचं आहे. डॉ.अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली 

आपला जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करूया.

जिल्हयात बाहेरून आलेल्या आपल्याच लोकांना कोरोना संसर्ग झालेला आहे. आणि त्यातील रूग्ण बरे होण्यास सुरूवातही झाली आहे. नागरिकांनी न घाबरता बरे होवून गेलेल्या रूग्णांना स्विकारले पाहिजे. आता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे संसर्गाचा धोका राहिलेला नाही. मात्र पुढिल सात दिवस खबरदारी म्हणून त्यांना वेगळे राहूद्या. याबाबत रुग्णांनाही सूचना दिल्या आहेत. जिल्हयातील उर्वरीत 23 रूग्णही लवकरच अशाप्रकारे बरे होवून आपापल्या घरी जातील हा विश्वास आम्हाला आहे.दीपक सिंगला, जिल्हाधिकारी गडचिरोली