अर्जुनी मोरगाव,दि.17 :-तालुक्यातील शेतकर्यांची मागणी लक्षात घेत पहिल्यांदा अन्न पुरवठा विभागाच्यावतीने खासदार प्रफुल पटेल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी केंद्र सरकारने राज्य सरकार मार्फत आधारभूत किमतीवर मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते.पावसाळ्याला सुरुवात झालेली असून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेत 15 जून रोजी नवेगावबांध येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात जात निवेदनातून 16 जून रोजी खरेदी न झाल्यास शेतकर्यानी आंदोलनाचा इशारा दिला होता.त्या इशाराकडेही दुर्लक्ष केल्याने आज 17 जूनला उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधसमोर मका आणून शेतकर्यांनी फेकून दिल्याने वातावरण तापले गेले आहे.
अन्न पुरवठा विभागाच्यावतीने आदिवासी विकास महामंडळातंर्गत पांढरवाणी आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मक्याचे लागवड केल्याने संस्थेला मका खरेदी करण्यासंबधी निर्देश द्यावे अशा सुचना राज्यसरकारने दिले.परंतू प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विभाग यांनी याकडे कानाडोळा केला.परिसरातील मका उत्पादक शेतकरी वारंवार उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधला चकरा मारत होते.परंतु मका खरेदी केंद्र सुरू झाले नाही.त्यामुळे येथील टीपाॅंईट चौकात जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,किशोर तरोणे,यशवंत गणवीर सह अन्य शेतकर्यांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आंदोलनाला सुरवात केली.आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार विनोद मेश्राम, आदिवासी विकास मंडळाचे उपप्रादेशीक अधिकारी पाटील,नवेगावबांधचे पोलीस निरिक्षक दिनकर ठोसरे घटनास्थळी दाखल होत,आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केले.





