देसाईगंज/वडसा,दि.१७: आतापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या देसाईगंज शहरात एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता ११ वर पोहचली आहे.मुंबईतील वाशी येथून २९ प्रवासी ६ जूनला देसाईगंज येथे आले होते. त्यातील १० प्रवाशांना देसाईगंज येथे, तर १७ जणांना धानोरा तालुक्यात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. उर्वरित २ जण गोंदिया जिल्ह्यातील असल्याने त्यांना तेथे पाठविण्यात आले होते.
देसाईगंज शहरातील १० पैकी एक २६ वर्षीय रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात होता. मंगळवारला(दि..१६) आरोग्य विभागाला प्राप्त अहवालात तो कोरोनाबाधित आढळून आला. उर्वरित ९ जणांचे अहवाल अजून प्राप्त व्हायचे आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहचली असून, ४० जण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या केवळ ११ सक्रिय कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.





