गोंदिया,दि.२२: तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मत्स्य उत्पादनाला अनुकूल स्थिती आहे. यामुळेच जिल्ह्यात सन २०१९-२० या वर्षात सुमारे ३४४ कोटी मत्स्यबीज उत्पादन करुन जिल्ह्याने नागपूर विभागात प्रथम स्थान प्राप्त केले आहे. हे अव्वल स्थान कायम राखण्यासाठी सन २०२०-२१ या वर्षातही गोंदिया जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाने कंबर कसली आहे.
गोंदिया जिल्ह्यात अनेक प्रकल्प, तलाव आहेत. त्यात मत्स्य पालन केले जाते. गोड्या पाण्यातील माशांना सर्वत्र मोठी मागणी असते. गत वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, तलाव तुडूंब भरले होते. खरिपातील पिकांना सिंचनानंतर प्रकल्प व तलावांमध्ये बऌयापैकी साठा शिल्लक असल्याने मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसायाला वाव मिळाला. यंदाच्या वर्षासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील १२ तलावांमध्ये मत्स्यबीज उत्पादन व ६९०५ तलावात मत्स्य व्यवसाय करण्याचे नियोजन आहे. सन २०१९-२० या वर्षात ३४४ कोटी मत्स्यबीज उत्पादन करुन जिल्ह्याने नागपूर विभागात प्रथम स्थान प्राप्त केला. पुढील वर्षी हे स्थान कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून नियोजन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील भानपूर, भादुली, गिरोला, ताडगाव, खोडशिवणी, बाक्टी, अंभोरासह बारा तलावात मत्स्यबीज उत्पादन करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सपकाळ यांनी सांगितले.
सिंचन विभागाचे ५६ आणि अन्य ६९०५ मालगुजारी तलावांमध्ये मत्स्यबीज टाकण्यात येणार आहे. १३३ मत्स्य व्यवसाय संस्थांच्या माध्यमातून ११०७७ सभासद आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायातून चालवितात. यंदाच्या हंगामात चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायासाठी जिल्ह्यात अनुकूल स्थिती राहणार असल्याचे बोलले जाते.
मत्स्यबीजोत्पादनात गोंदिया विभागात अव्वल
वर्षभरात ३४४ कोटी मत्स्यबीजाचे उत्पादन





