शौचालयांचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत गाठा-पुराम

0
7

गोंदिया दि.९: एक माणूस जग बदलू शकतो. मनापासून कार्य केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. स्वच्छतेच्या बाबतीत जगातल्या दहा गलिच्छ देशात आपल्या देशाचा समावेश आहे. ही बाब फार लाजिरवाणी आहे. देशाला निर्मल करण्यासाठी ग्रामसेवकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याच्या वापरावर भर देऊन डिसेंबर अखेरपर्यंत नियोजित उद्दिष्ट गाठा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी केले.स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात मंगळवार (दि.७) जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले, वर्तमानात कार्य केले तर भविष्य चांगले होते. शासन आपल्याला सर्वकाही देते, याची जाणीव ठेवा. आपण ज्या लोकांसाठी कार्य करतो, ते आपले बांधवच आहेत. त्यामुळे जीव ओतून कार्य करा. नियोजित उद्दिष्ट साध्य करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी याप्रसंगी दिली.
सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील आठही पंचायत समिती अंतर्गत ३१ हजार ६२८ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट तथा कृती आराखड्यात समाविष्ट नसलेल्या ग्रामपंचायतींमध्येसुद्धा वैयक्तीक शौचालयांचे बांधकाम करता येते. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात येतो.
याप्रसंगी प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय बांधकामाचा आढावा घेण्यात आला. ग्रामसेवकांनी त्यांच्या ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट, आतापर्यंत पूर्ण झालेले बांधकाम तथा शिल्लक बांधकामाचे नियोजन सादर केले. केवळ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करूनच चालणार नाही, तर त्याचा वापर व्हायला पाहिजे. पूर्ण झालेल्या बांधकामाचे आॅनलाईन करण्याचे निर्देशसुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी याप्रसंगी दिले.
दरम्यान ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, तालुकाध्यक्ष पृथ्वीराज कोल्हटकर यांनी नियोजित कालावधीत शौचालयांचे बांधकाम करण्याची ग्वाही देवून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सर्व तज्ज्ञ, सल्लागार उपस्थित होते.