कोरंभी विकासाकरिता मिलिटरी टुरिझमचा पुढाकार

0
14

भंडारा दि. ११: वैनगंगा नदीकाठावरील निसर्गरम्य परिसरातील कोरंभी देवस्थान हे विदर्भातील महत्वपूर्ण पर्यटन केंद्र व्हावे अशी भंडारेकरांची इच्छा आहे. परिणामी राज्य शासन अंगिकृत मिलिटरी टुरिझममुळे ही इच्छा साकार होण्याची आशा बळावली आहे. महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमेन कार्पाेरेशन पुणेच्या वतीने सहकार्य लाभत आहे.

भंडारा तालुक्यातील कोरंभीस्थित टेकडीच्या पायथ्याशी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच छाया शिवशंकर वणवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कोरंभीस्मृतिवन समितीचे महादेव चुंभरे, उपसरपंच मनोहर नागदेवे, सामाजिक वनिकरण विभागाचे सहायक संचालक नरेशचंद्र कावळे, लागवड अधिकारी नरहरी सार्वे, मिलिटरी टुरिझनचे विपणन व्यवस्थापक यातेंद्र खोत, पटेल महाविद्यालयाचे रासेयो पथकाचे माजी प्रमुख प्रमोद तिजारे, कोरंभी स्मृतीवन समितीचे कोषाध्यक्ष प्रा. वामन तुरिले, हेमंत राखडे, प्रशांत वैद्य, स्वप्नील आकरे आदी उपस्थित होते.

यावेळी यातेंद्र खोत म्हणाले, कोरंभी येथे पर्यटकांना आकर्षित करण्याकरीता अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमात संपूर्ण व्यवस्थापन माजी सैनिकांचे राहणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थ, माजी सैनिक संघटना व बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. उपक्रमातून मिळणाऱ्या नफ्याद्वारे सैनिकांच्या विधवांना, असहाय्य सैनिकांना मदत दिली जाईल महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमॅन कार्पाेरेशनचे महाव्यवस्थापक कर्नल सुहास जतकर, व्यवस्थापक आर.जी. कुलकर्णी व कर्नल हेमंत केंडे यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे. आभार सरपंच वणवे यांनी मानले.