गर्रा बघेड़ात मिळणार वायफाय सुविधा; खासदारांनी घेतला सांसद आदर्श ग्रामचा आढावा

0
8

भंडारा दि.१४: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राममध्ये वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ आज खासदार नाना पटोले यांनी सुद्धा गर्रा बघेड़ा या गावात वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश भारत संचार निगम च्या अधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे वायफाय सुविधा मिळणारे गर्रा हे महाराष्ट्रतील दुसरे गाव ठरणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात खासदार नाना पटोले यांनी सांसद आदर्श ग्राम अंतर्गत गर्रा या गावात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधीक्षक दिलीप झलके प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. पटोले म्हणाले, गावात मुलभूत सोयी सुविधा तयार करण्यासोबतच गावातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे. दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, शेतीआधारित कुटीर उद्योग, फलोत्पादन आदी उद्योग करण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित करावे. गोबरवाही पाणीपुरवठा योजना, अंगणवाड़ी बांधकाम, वर्गखोल्यांचे बांधकाम, गावात शुद्ध पाणी देण्यासाठी व्यवस्था, शौचालय बांधकाम, गावाची स्वच्छता, गावातील लोकांमध्ये चांगल्या सवयी रुजविण्यासाठी प्रयत्न इत्यादी विषयांवर त्यांनी सखोल चर्चा केली. तसेच गावातील सुशिक्षित बेरोजगारांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी केंद्र स्थापन करून सोबत ग्रंथालयाची निर्मिती करावी. गावात प्रशस्त ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम करावे. त्यामध्ये प्रशिक्षण हॉल, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र इत्यादी सुविधा कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. गावात 15 ऑगस्ट पर्यन्त सर्व काम सुरु करावे. 15 ऑगस्ट नंतर गावात प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आड़े, तुमसर गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.