गोपाळ समाजासाठी तहसीलदारांची धडपड

0
14

साकोली दि.२५: प्रशासनाने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने जर मनावर घेतले तर समाजातील प्रत्येक व्यक्ती समाजात व्यवस्थीत जीवन जगू शकतो असाच प्रत्यय साकोलीत आला. साकोलीच्या तहसिलदार डॉ. हंसा मोहणे यांनी येथील गोपाळ समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. अखेर या गोपाळ समाजाला त्यांचा हक्क मिळवून दिला.

कित्येक वर्षांपासून गोपाळ समाज उपेक्षीत होता. या समाजाकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. त्यामुळे हा समाज गावाबाहेर राहत होता. मागीलवर्षी माजी उपसरपंच किशोर पोगळे यांनी गोपाळ समाजाच्या तांड्यावर जावून त्यांची समस्या जाणून घेतली. ग्रामपंचायतर्फे बोरवेल व लाईटची सुविधा उपलब्ध करून दिली. एवढेच नाही तर त्यांच्या तांड्यातील प्रत्येक घरांना गृहकर लावून दिला. त्यानंतर ग्रामपंचायत बरखास्त झाली व नगरपंचायतची घोषणा झाल्यामुळे उर्वरित विकास कामे करण्यास अडचणी आल्या.

भटक्या जमातील या गोपाळ लोकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी तहसिलदारांनी पाऊल उचलले. त्यांना शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना गोपाळसमाजातील लोकांचे आधी सर्वे केले व सुवर्ण जयंती राजस्व अभियान योजनेअंतर्गत गोपाळ समाजाला सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

कटकवार शाळेत पार पडलेल्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान कार्यक्रमात तहसिलदार यांच्या हस्ते १२ कुटुंबांना राशनकार्ड, २२ लोकांचे आधार कार्ड, २१ जणांचे जातीचे प्रमाणपत्र, २ जणांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र तर १७ लोकांचे नमुना आठचे फार्म भरून बीएलओ मार्फत मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्यात आले. पहिल्यांदाच या समाजातील लोकांची शासनदप्तरी नोंद तहसिलदारांनी करून दिली. याकरिता साकोलीचे नायब तहसिलदार पवार, तलाठी मदनकर, काळसर्पे, कुंभरे, शेंडे, रामटेके, इलमकर, बहेकार, मेश्राम, तलमले, प्राचार्य खेडीकर यांनी सहकार्य केले.