१८१ ग्रा.पं.मध्ये आज मतदान

0
14

गोंदिया दि.२५: जिल्ह्यातील १८१ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह सात ग्राम पंचायतीत पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (दि.२५) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचारीही संबंधित मतदान केंद्रांवर रवाना झाले. सुरक्षा बंदोबस्तासाठी १४१३ पोलीस कर्मचारी तर १२३ अधिकारी व ७५ वनरक्षक, वनपाल तैनात केले आहेत.
ग्राम पंचायतच्या निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गोंदिया पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. गुरूवारच्या सायंकाळी ५ वाजता ग्राम पंचायतीच्या प्रचारतोफा थंडावल्या. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कार्यकाळ संपणार्‍या १८१ ग्राम पंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. त्यासाठी ३0७५ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत कोणताही वादविवाह होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आता ग्राम पंचायतीच्या निवडणूक होत असल्याने गावागावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सात ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुका याच दिवशी होत आहेत. १८१ ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक व ११ ग्राम पंचायतच्या प्रभागांमध्ये पोटनिवडणुकांसाठी ५४१ बूथवर मतदान होणार आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षकांसह एक अप्पर पोलीस अधीक्षक, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, १0२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ९६३ पोलीस कर्मचारी, ७५ वनरक्षक, वनपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय शांतता राखण्यासाठी पोलीस विभागाला मदत करण्यासाठी ४00 पुरूष गृहरक्षक व ५0 महिला गृहरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांना संबंधित पोलीस ठाण्यात एक दिवस आधी पाठविण्यात आले आहे.