24.7 C
Gondiā
Monday, July 7, 2025
Home Blog Page 4

आमगांव मुख्य रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या!

0

आमगांव  : आमगांव नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. परंतु सकाळपासून सायंकाळपर्यंत बसस्थानक चौक, गांधी चौक, कामठा चौक, आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यांच्या मधोमध गाई व पाळीव प्राण्यांनी आपला ठिय्या मांडल्याने वाहनचालकांना (Driver) कमालीचा त्रास होत आहे.आमगांव येथील या मुख्य रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा (Animals) त्रास सहन करावा लागतो. पशुमालकांचे (Animal Owner) याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे हे प्राणी दिवसभर रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात. वाहनचालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना (Principal) याबाबत माहिती दिली. परंतु आजपर्यंत, रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या पाळीव प्राण्यांवर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमगांव शहराच्या मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांच्या मालकांवर त्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती जनतेने केली आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पारधी लाच घेतांना अटक

0

गोंदिया,दि.०४ः गोंदिया तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती गुलाबो पारधी यांना सोमवार(दि.३०) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंदाजे ९०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर महिला अंगणवाडी पर्यवेक्षिकेला लाच घेतांना अटक करण्यात आल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,जि.प.गोंदिया यांना पत्राद्वारे कळविण्यात आली असून संबधित विभागाने अंगणवाडी पर्येवेक्षिका श्रीमती पारधी यांच्यावर निलबंनाची कारवाई सुरु केली आहे.

एमपीएससीत रितिका दोनोंडेची उत्तुंग भरारी

0

गोंदिया,दि.०४ः सालेकसा तालुक्यातील साखरीटोला/सातगाव येथील रितिका प्रभाकर दोनोंडे हिने एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून गावासह आईवडिलांचे नाव मोठे केले. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मेहनत व जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे, हे रितिकाने राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून सिद्ध केले. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पीडब्लूडी विभागात वर्ग 2 पदी तिची नियुक्ती झाली आहे. या यशाचे श्रेय तिने वडील प्रभाकर दोनोंडे, आई मंजुषा दोनोडे आणि मार्गदर्शक शिक्षक व सततच्या अभ्यासाला दिले. निरंतर अभ्यासामुळेच ही मजल मारल्याचे एमपीएससी परीक्षा विजेती रितिका दोनोंडे हिने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भविष्यात गोंदिया जिल्हा व सालेकसा तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल. तसेच तालुक्याचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ग्रामपंचायतींना दिल्या प्रत्यक्ष भेटी

0
स्थानिक पातळीवर जनतेची कामे मार्गी लागण्यासाठी गाव पातळीवरील विविध कार्यालयांनी घेतली गती*
गावातील नागरिकांसमवेत संवादावर भर
नागपूर,दि.4: सर्वसामान्य लोकांना स्थानिक पातळीशी निगडीत असलेल्या अडचणींवर गावातच मात करता यावी, त्यांच्या अडचणी गावपातळीवरच निकाली निघाव्यात यासाठी गाव पातळीवरील कार्यालयांनी गती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दररोज झालेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने निश्चित केल्या प्रमाणे पहिला बुधवार व इतर दिवशी ग्रामपंचायत व तलाठी साजा कार्यालयात संबंधित अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष हजर राहून लोकांच्या तक्रारी मार्गी लावत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज मौदा तालुक्यातील पावडदौना, कामठी तालुक्यातील गुमथळा व इतर गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून समाधान केले.
*पंधरा दिवसात अर्ज निघतील निकाली*
तुमचे प्रश्न गावातच निकाली निघावेत यासाठी अनेक उपक्रमासमवेत समाधान दिवस हा आपण सुरु केला आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी प्रत्येक गावातील संबंधित अधिकारी हे गावातच उपलब्ध असल्याने त्या अर्जाबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल. पहिल्या बुधवारी आलेल्या अर्जाचा निपटारा हा तिसऱ्या बुधवारी म्हणजेच पंधरा दिवसाच्या कालावधीत मार्गी लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुमथळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बैठकीत सांगितले. या बैठकीस सरपंच शिलाताई वांगे, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, तहसीलदार दत्तात्रय निबांळकर, मंडळ अधिकारी राहूल भुजाडे, तलाठी प्रतिक्षा पाटील, ग्रामसेवक अंकिता चकोले आदी उपस्थित होते.
*खोट्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत*
समाधान दिवसाच्या माध्यमातून गाव पातळीवरील प्रशासनाला अधिक कर्तव्य तत्पर व गतिमान केले जात आहे. यात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्तम आहे. तथापी काही गावांमध्ये जाणीवपूर्वक ब्लॉकमेल करण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
पावडदौना येथे आयोजित समाधान दिवसात दहा तक्रारी प्राप्त झाल्या. यात आठ महसूल व दोन कृषी विभागाशी निगडीत आहेत. त्याचे निराकरण केल्या जात आहे. समाधान दिवसाच्यानिमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबीराचेही आयोजित करण्यात आले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राज्यात गेल्या अडीच वर्षात ४२७ पोलीसांचा मृत्यू;२५ पोलीसांनी केली आत्महत्या

0
file photo

७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा-मुख्यमंत्री

मुंबई:-राज्यात गेल्या अडीच वर्षांत ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून यात २५ आत्महत्यांचा समावेश आहे. ७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारने तातडीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील प्रत्येक पोलिस युनिटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा लागणार आहे. आठवड्यात किती पोलिसांशी संवाद झाला याची नोंद ठेवण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.

ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या ड्यूटीदरम्यान होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डीजी लोन आदी प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. पोलिसांच्या ड्यूटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्यूटी व प्रवासात जातात. त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत आहेत.

गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या काही वर्षांत हृदयविकार, कर्करोग, आत्महत्या अशा विविध कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. यात कार्डियाक अरेस्टमुळे ७५ मृत्यू, कर्करोगामुळे ६ मृत्यू झाले आहेत. पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून यात ४० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी राज्यात २७० हॉस्पिटल्ससोबत टायअप केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरतीसंदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. यासाठी सर्व विभागांना यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत.

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना

0
केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी
बुलढाणा,दि. 4  : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आज खामगाव येथून ‘विठ्ठल दर्शन एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे मोठ्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली. या पहिल्या फेरित एकूण १६२९ भाविक सहभागी झाले होते. रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, सागर फुंडकर उपस्थित होते. या वारकऱ्यांना खामगावकरांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’च्या गजरात हजारोंच्या संख्येने निरोप दिला.
स्टेशन परिसरात भक्तीरसात न्हालेली गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजरात गाणारे वारकरी, व विविध संघटनांकडून करण्यात आलेले अल्पोपहार व पाण्याचे वाटप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता. गेल्या सात वर्षांपासून खामगावहून आषाढी एकादशीसाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरु असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या पहिल्या फेरितून विभागाला ६ लाख ३२ हजार ३५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून यामध्ये सर्वसाधारण, राखीव व वातानुकूलित तिकिटांचा समावेश आहे. या पवित्र यात्रेच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी स्थानिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचे योगदान उल्लेखनीय होते.

देवरी येथे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा सभा

0

देवरी,दि.4 जुलै – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सभागृहात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा सभा संपन्न झाली.सदर आढावा सभेत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे उपस्थित होते.आढावा सभेत देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहायक,आरोग्य सहयिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा गट प्रवर्तक, तालुका स्तरीय कर्मचारी उपस्थित होते.

आढावा सभेत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी माता व बाल मृत्यु टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे त्यात किशोरावस्थापासुनच त्यांच्या विविध तपासणी सोबत गरोदर मातेचे बारा आठवड्याच्या आत नोंदणी,लोह,रक्तक्षय व कँल्शियम यांची मात्रा लाभार्थ्यांना देणे,वेळेत लसीकरण व फॉलोअप ठेव्ण्याच्या सुचना दिल्या.आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली(एच.एम.आय.एस.) ,एकात्मिक आरोग्य माहिती मंच आय.एच.आय.पी. ऑनलाइन पोर्टल,फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एफ.पी.एल.एम.आय.एस.)ॲप कुटुंब नियोजन वस्तूंचा साठा व्यवस्थापित करणेमागणी करणे आणि जारी करणे यावर मार्गदर्शन केले.DHIS2 आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली,यू-विन पोर्टलवरून गरोदर माता आणि बाळाची लसीकरणाची नोंद ऑनलाइन पोर्टल अद्यावत करणे, यू-विन पोर्टल अंतर्गत लाभार्थ्यांच्या लसींची रिअल-टाइम एन्ट्री नियमित करणे.

एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) हे साथीचे रोग तसेच इतर आरोग्यविषयक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी महत्वाचे पोर्टल असुन सर्व आरोग्य संस्थानी एस,पी व एल.फॉर्म दैंनदीन भरण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण  यांनी पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजार जसे हिवताप व डेंग्युची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांचे नियमित गृहभेटी सर्वेक्षण,डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीचे उपाययोजनागावात आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाययोजना, जैविक बाबी,प्रौढ डास व अळी कमी करण्याचे विविध पद्धती,मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना,नवीन आणि उपचारांच्या पद्धती विषयी मार्गदर्शन करणे,डासअळी नाशक पद्धती अशा विविध बाबींचा आढावा याप्रसंगी घेवुन मार्गदर्शन केले.आढावा सभा यशस्वीतेसाठी देवरी तालुका आरोग्य सहाय्यक वरखेडे, संगणक परिचालक शहारे यांनी विशेष प्रयत्न केले.

तपासणीआड कृषी केंद्र व्यवसायीकांकडून वसुली

0

प्रभारी कृषी विकास अधिकाऱ्याची सीईओंकडे तक्रार

गोंदिया ः कृषी सेवा केंद्राच्या तपासणीआड प्रभारी कृषी विकास अधिकाऱ्याने कृषी व्यवसायीकांकडून वसुलीचा प्रयत्न केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. व्यवसायीकांनी याप्रकरणी जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे व त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत कारवाईचे निर्देश दिले आहे.

जिल्ह्यात खरिपाच्या तोंडावर खताची साठेबाजी होत असून, शेतकऱ्यांवर वाढीव दराने खत खरेदीची वेळ आली आहे. याविषयी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी प्रमोद कागदीमेश्राम यांना काही कृषी सेवा केंद्राची तपासणी करा, अशी सूचना केली. परंतु, नव्या शासन आदेशानुसार कृषी विकास अधिकाऱ्यांचे तपासणीचे अधिकार काढल्याचे सांगत हे काम करण्यास कागदीमेश्राम यांनी नकार दिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच ते आमगाव येथील जय भवानी कृषी सेवा केंद्र व त्यानंतर कट्टीपार येथील कृषी सेवा केंद्राची तपासणी करून पैशाची मागणी करीत असल्याचे व्यवसायीकांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष हर्षे यांना कळविले. त्यानंतर गोरेगाव तालुक्‍यातूनही कागदीमेश्राम यांनी पैशाची मागणी केल्याबाबत व्यवसायीकांनी माहिती दिली. यावेळी भ्रमणध्वनीवरून कागदीमेश्राम यांच्याशी उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी संवाद साधला असता त्यांनी चूक झाल्याची कबुली दिली. मात्र, हर्षे यांनी ही बाब गांभीर्याने घेत थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांना याबाबत माहिती देत कागदीमेश्राम यांच्यावर कारवाईची सूचना केली. आता त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे आैत्सुक्याचे आहे.

प्रभारी कृषी विकास अधिकारी कागदीमेश्राम हे तपासणीआड पैशाची मागणी करीत असल्याच्या अनेक तक्रारी कृषी व्यवसायीकांनी केल्या. त्यामुळे त्यांचा पदभार काढावा, अशी शिफारस सीईओंकडे केली आहे.

-सुरेश हर्षे,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, गोंदिया

शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा-आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधानपरिषदेत मागणी

0

मुंबई:-शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असा शासन आदेश असताना,शिक्षकांना सातत्याने या ना त्या कारणाने शैक्षणिक कामे लावली जातात.ही अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशी मागणी कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली.ते विधानपरिषदे मध्ये औचित्याच्या मुद्यावर बोलत होते.शिक्षकांना बी.एल.ओ, सारखी कामे देणे,युडायस, अपार,व विविध शिष्यवृत्त्या यांची ऑनलाइन कामे देणे हे बौद्धिक शैक्षणिक कामाला बाधा आणणारे ठरत आहे.तरी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणे तात्काळ थांबवण्यात यावे असे मांडले.यावर सभापती राम शिंदे यांनी यावर सरकार निर्णय घेईल असे आश्वस्त केले.

भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे वृक्षारोपण

0

तिरोडा-सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया परिक्षेत्र तिरोडा अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे वनपाल एम आर एटरे, वनपाल पी एफ डहाट, उपसरपंच बाळकृष्ण सोनेवाने, प्राचार्य डी आर गिरीपुंजे ,ज्येष्ठ शिक्षक गोविंदप्रसाद बिसेन, डी एस बोदेले, वनमजूर इंद्रकुमार साठवणे, चंद्रशेखर पटले, राजू नंदेश्वर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी शालेय पटांगणात विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली विद्यार्थ्यांनी ‘ एक पेड मा के नाम ‘ यानुसार मनाशी गाठ बांधून वृक्ष संवर्धनाची कास धरली. त्या झाडाला दत्तक समजून संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाचे संचालन डी एस बोदेले ,प्रास्ताविक प्राचार्य डी आर गिरीपुंजे ,आभार प्रदर्शन आर के किरसाण यांनी केले यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.