डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री चैत्यभूमीवर

0
13

मुंबई, दि.०६ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कमध्ये दाखल होत आहेत.   चैत्यभूमीला भीमसागराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.इंदुमिलवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं टेंडर निघाले असून इंदुमिल संदर्भातील ऑन फिल्ड काम १ महिन्याच्या आत सुरु होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (बुधवार) चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, संविधानांतर्गत सामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचवण्याचा संकल्प आणि समतेचं राज्य पोहोचवण्याचा संकल्प आम्ही करतोय. महापरिनिर्वाणदिनानिमित्त आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करायला आलोय, असेही मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, महादेव जानकर, आनंदराज आंबेडकर, अबू आझमी यांनी अभिवादन केले,

ओखी वादळामुळे मुंबईत पावसाची रिपरिप असली तरीही भीमसैनिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. पाऊस सुरू झाल्याने महापालिकेच्या ७० शाळांमध्ये अनुयायांची व्यवस्था करण्यात आली. येथे वैद्यकीय तपासणीची सुविधा आहे. दादर रेल्वे स्थानकावर उतरणा-या अनुयायींना विनाशुल्क बेस्ट बसद्वारे उपलब्ध शाळांमध्ये नेण्यात येत होते. महापालिकेचे २४ विभागीय नियंत्रण कक्ष सतर्क ठेवण्यात आले असून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, दादर, नायगाव, परेल, माहीम, खेरवाडी येथील शाळा, समाज मंदिरातही अनुयायांची व्यवस्था करण्यात आली.