39.1 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 5655

टिप्परच्या धडकेत हेल्परचा मृत्यू

0

berartimes.com नागपूर,दि.22 :उमरेड-भिवापूर मार्गावर आज पहाटे पाचच्या सुमारास दोन टिप्परची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला असून तिघे जम्भीर जखमी झाले आहेत. दोन्ही टिप्परचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास गाईला वाचविण्याचा प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दोन टिप्पर आपआपसात धडकले. हा अपघात इतका भिषण होता की यात एका टिप्परच्या हेल्परचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जन गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ उमरेड-भिवापूर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

बसने चिरडले दोघांना; एकाचा मृत्यू

0

berartimes.com गोंदिया,दि.22:– गोंदिया- कोहमारा राज्यमार्गा वरील हिरडामालीजवळ मोहगाव फाट्यावर बसची वाट बघत असलेल्या प्रवाशांना राज्य परिवहन मंडळाच्या बसने दोघांना चिरडल्याची घटना आज गुरूवारी सकाळी १०. १५ वाजता दरम्यान घडली.या अपघातातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिलेचे नाव जयवंताबाई मणिराम राऊत रा. मोहगाव बूज  वय ६० असे आहे.

गोंदिया आगाराची गोंदिया – तेढा -देवरी बस  (क्रमांक एम एच २० ९१७५) या बसच्या स्टेअरिंगचा गुटखा निघाल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि बसची वाट बघत असलेल्या प्रवाश्याना धडक दिली. यात दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील केवलसिंग अंबुले या इसमाच्या पायावरून बसचे चाके गेल्याने पायाचे हाड मोडल्या गेले. तसेच बसचेही थोडे नुकसान झाले कशातरी प्रकारे वाहन चालक लिलाराम हरिणखेडेने बसला थांबविण्याचा प्रयत्न केला.  जखमी वर गोंदिया येथील सामान्य रुग्नालय मध्ये उपचार सुरु आहे. राज्य परिवहन मंडळाच्या अधिका-्यांनी घटना स्थळा वर जाऊन पंचनामा केला. आणि जखमी रूग्णांची भेट घेतली.
अपघातातील जखमी महिलेला जेव्हा उपचारासाठी गोंदियाच्या शासकिय रूग्णालया नेण्यात आले. तेव्हा प्राथमिक उपचारानंतर वार्ड क्र. १ मध्ये उपचारासाठी पाठविले. वार्ड क्र. १ मध्ये महिला रूग्ण जखमी अवस्थेत असतांनाही तेथील परीचारीका आणि वैद्यकिय अधिका-याने त्या जखमी महिलेकडे लक्ष न दिल्याने शेवटी नाकातून रक्त निघाल्यानंतर योग्य उपचाराअभावी महिलेने रूग्णालयातच शेवटचा श्वास घेतला.त्यानंतर तेथील वैद्यकिय अधिका-याला जाग आली. तर पायावरून चाक गेलेला जखमी इसम हा स्टे्रचरवर शस्त्रक्रिया रूम समोर अर्धातासापेक्षा जास्त कूठल्याही आरोग्य कर्मचा-याशिवाय एकटा पडून होता. या सर्व प्रकरणावर रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी रूग्णालयातील अपु-या मनुष्यबळामुळे काम करणा-या कर्मा-यांवर ताण पडतो त्यामूळे थोडाफार उशिर झाला असेल असे सांगितले.

उरणजवळ दिसले शस्त्रधारी संशयित, नौदलाकडून हाय अलर्ट

0
नवी मुंबई, दि. 22 – उरणजवळ चार ते पाच शस्त्रधारी संशयितांना पाहिले असल्याचा दावा दोन शाळकरी मुलांनी केला आहे. त्यानंतर नौदलाने शोधमोहीम सुरु केली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नौदलाच्या शस्त्रसाठा भांडार आयएनएस अभिमन्यूजवळ हे संशयित दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. नौदलासह लष्कर आणि मुंबई दहशतवाद विरोधी पथकासह सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे.मुंबई पोलिसांनी अनेक महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावली असून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. कुलाबा पोलिसांनीदेखील अधिका-यांना अलर्ट दिला असून सुरक्षेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

‘तंबाखूमुक्त भारत’साठी स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधन करावे – राजकुमार बडोले

0

मुंबई,berartimes.com, दि. 21 : भारत हा 2020मध्ये तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे.या तरुणांमधील  व्यसनाधीनता ही प्रमुख समस्या निर्माण होत आहे. त्यापासून वाचविण्यासाठी ‘तंबाखूमुक्त भारत’ सारख्या अभियानाची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी समाजातील तळागाळापर्यंत प्रबोधन करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी केले.

            नरोत्तम सेख्सारिया फाऊंडेशन व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या वतीने तंबाखूमुक्त भारत अनुदान-पुरस्कारांचे वितरण श्री. बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटमधील विभागप्रमुख डॉ. पंकज चतुर्वेदी, डॉ. कैलाश शर्मा, नरोत्तम फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा लेनी चौधरी, सलाम मुंबई फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा राजश्री कदम,डॉ. विरल कामदार, नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास आदी यावेळी उपस्थित होते. नरोत्तम सेख्सारिया फाऊंडेशनच्या वतीने एकनाथ कुंभार (कोल्हापूर),रंजना सुखदेव चोरमारे (नागपूर), जहीर रशीद खान (चंद्रपूर) यांना वैयक्तिक कार्यासाठी एक लाखांचा पुरस्कार तसेच अहमदाबादच्या सेंटर ऑफ हेल्थ,नाशिकची लोकविकास संस्थेच्या आशाचा चौधरी, औरंगाबादच्या चेतना फाऊंडेशनच्या गायत्री रंधार यांच्यासह राजस्थान व मध्यप्रदेशातील संस्थांना पाच लाखांच्या अनुदानाचे वाटप यावेळी करण्यात आले.

            श्री. बडोले म्हणाले की, आर्थिक विषमतेमुळे सध्या समाजात गरिब व श्रीमंत अशी दरी निर्माण झाली आहे. मात्र या दोन्ही गटातील युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. समाजात आज फॅशन म्हणून व्यसन करण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे  तरुणांचा देश म्हणून ओळल्या जाणाऱ्या देशापुढे ही समस्या निर्माण झाली आहे. बेरोजगारी सारख्या समस्यांमुळेही तरुण पिढी तंबाखू, मद्य, गुटख्या यासारख्या व्यसनांकडे वळल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. व्यसनाचे हे संकट टाळण्यासाठी शासनाबरोबर स्वयंसेवी संस्थांनी ‘तंबाखूमुक्त भारत’ सारखे उपक्रम राबवून जनजागृती करावी. नरोत्तम सेख्सारिया फाऊंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थांचे यासंदर्भातील काम कौतुकास्पद आहे. यावेळी श्रीमती चौधरी यांनी पुरस्कार वितरणासंदर्भात माहिती दिली. डोंगरीमधील सुपर आर्मी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारूडाच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामाचे सादरीकरण केले.

क्रीडा कौशल्य दाखवून जिल्ह्याचा नावलौकीक करा- न्या.गिरटकर

0

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
गोंदिया,दि.२२ : पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा क्रीडा स्पर्धेतून आपले क्रीडा कौशल्य दाखवून राज्य व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून जिल्ह्याचा नावलौकीक करावा. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी.गिरटकर यांनी केले.
२१ सप्टेबर रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०१६ चे उदघाटन करतांना न्या.गिरटकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी देविदास इलमकर (तिरोडा), श्रीमती दिपाली खन्ना (आमगाव), मंदार जवळे (देवरी), रमेश बरकते (गोंदिया) व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ म्हणाले, खिलाडी वृत्तीतून विविध खेळात प्राविण्य दाखविण्याचा प्रयत्न या क्रीडा स्पर्धातून होत आहे. गुणवंत खेळाडूंची निवड या स्पर्धेतून पुढील खेळांसाठी करण्यात येते. या स्पर्धेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिरीरीने भाग घेवून पुढील स्पर्धेसाठी चांगली कामगीर करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.
जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत आमगाव, देवरी, गोंदिया, तिरोडा व गोंदिया पोलीस मुख्यालयातील जवळपास ३०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील खेळाडूंनी सुरेख पथसंचलन केले. गायत्री बरेजू व सनद सुपारे या खेळाडूंनी आणलेल्या मशालीने न्या.गिरटकर यांनी दीप प्रज्वलीत केली. चंद्रबहादूर ठाकूर या खेळाडूंनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. मान्यवरांनी यावेळी विविध रंगांचे फुगे आकाशात सोडले. यावेळी न्या.गिरटकर यांना पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी स्मृतीचिन्ह भेट दिले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आमगाव व देवरी संघादरम्यान कबड्डीचा उदघाटकीय सामना घेण्यात आला. यामध्ये आमगाव संघाने विजय संपादन केला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मुख्यालयाचे राखीव पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक यांचेसह विविध पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच खेळाडू मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी मानले.

तुमसर पालिकेचे कार्य प्रशंसनीय: राज्यस्तरीय हागणदारीमुक्त पथकाची पाहणी

0

तुमसर berartimes.com,दि.22 : हागणदारीमुक्त अभियानाची राज्यस्तरीय पथकाकडून पाहणी दरम्यान शहरातील १० मुख्य ठिकाणाची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, परिसरातील स्वच्छता व शहराचे सौंदर्यीकरण भुरळ पाडणारे आहे. विशेष म्हणजे प्रात:वेळी एकही इसम उघड्यावर शौच करताना आढळले नाही. एकंदरीत नगर पालिकेचे कार्य पथकाला प्रशंसनिय वाटले असून केंद्रीय समितीकडे शिफारस करण्यात येत असल्याचे तपासणी समितीने मह्टले आहे.यावेळी राज्यस्तरीय पथकातील नागपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्धीकी, शोभा राऊत, समाज सेविका दुर्गा भरळे उपस्थित होते.

सुधीर शंभरकर म्हणाले, यापुर्वी सन १९९३ मध्ये अशीच पाहणी करण्याकरिता तुमसर नगरपरिषदेमध्ये आले असताना त्यावेळी नाराज होऊन परतलो होतो. तुमसर माझ्याकरिता नवीन नव्हता. कुठे कुठे उघड्यावर शौच केल्या जाते हे माझ्या लक्षात होते. त्यामुळे आमच्या पथकाने २१ सप्टेंबरला पहाटे ५.१५ ला तुमसर गाठून शहराबाहेरील त्या रस्त्यावर आमचे पथक तैनात झाले होते. मात्र एकही इसम उघड्यावर शौच करताना दिसला नाही. त्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचेही कौतूक करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर तुमसरचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे हे कर्तृत्ववान, क्रियाशिल नगराध्यक्ष असून त्यांना मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने हे समविचारी मिळाल्याने झपाट्याने शहराचा विकास करून सौंदर्यीकरण शक्य झाले, असे कोणत्याही नगर परिषदमध्ये पाहायला मिळत नाही. दोन वर्षापुर्वीचा तुमसर व आताच्या तुमसरात बराच फरक पाहायला मिळाल्याने पथकाने त्यांच्या कार्याची स्तुती केली.हागणदारी मुक्त अभियानअंतर्गत तुमसर नगर परिषदची निवड करून केंद्रीय समितीकडे नगर परिषदची शिफारसही करण्यात आली आहे. राज्यस्तरावर तुमसरचे नाव तर चकाकलेच आहे. ते आता केंद्रापर्यंत पोहचतील, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

यावेळी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने उपाध्यक्षा सरोज भुरे, नगरसेवक सलाम तुरक, आशिष कुकडे, दिपक कठाणे, शालिनी पेठे, मनिष अग्रवाल, वहीद खान, किशोर साखरकर, मोहन बोरधरे, प्रविण बोरकर, सुमेद खापर्डे, सुनिल लांजेवार, जमिल शेख, गणेश मेहर, सुनिल चौधरी यांच्यासह पालकीचे पदाधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

गाणारांची उमेदवारी अवैध बिजवारांचा दावा

0

नागपूर,दि.22 : नागो गाणार यांना विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र शिक्षक परिषदेत फूट पडली आहे. भंडारा जिल्ह्यातील वरठीमध्ये परिषदेच्या नागपूर विभागाच्या बैठकीत परिषदेतर्फे वर्धा जिल्ह्याच्या शेषराव बीजवार यांना उमेदवार घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यमान आमदार नागो गाणार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिषदेच्या समर्थनामुळेच गाणारांनी मागील निवडणूक जिंकली होती.विभागीय अध्यक्ष उल्हास फडके यांनी बीजवार यांना उमेदवारी मिळाल्याच्या वृत्ताला होकार दिला. सध्या ते मतदार नोंदणीच्या कामात लागले आहेत.

 परिषदेच्या नागपूर विभागाचे पदाधिकारी संघटनेशी जुळलेल्या सदस्यांना याची माहिती देत आहेत. परिषदेच्या नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ.उल्हास फडके व कार्यवाह सुदाम काकपुरे  वृत्ताला दुजोरा दिला. गाणार नागपूर विभागातून उमेदवार नाहीत. संघटनेने बीजवार यांना उमेदवारी दिली आहे. ३ सप्टेंबर रोजी पुण्यात राज्य कार्यकारिणीने गाणार यांना उमेदवारी दिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परिषदेच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रत्यक्षात राज्य कार्यकारिणीच अवैध आहे. या कार्यकारिणीचा कार्यकाळ २०१४ मध्येच संपला. त्यामुळे आता कार्यकारिणीला निवडणूक कार्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे सांगितले.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. परिषदेच्यावतीने नागो गाणार यांना परत उमेदवारी देण्यासंदर्भात नागपूर विभागीय अध्यक्षांसमवेत कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याअगोदर सर्वांनी पदाचा राजीनामादेखील दिला होता. सोबतच ३ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत गाणार यांना उमेदवारी देण्याच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचादेखील निर्णय घेतला होता. पुण्यात झालेल्या बैठकीत या निर्णयाला अमान्य करण्यात आले.

देह व्यापाराच्या अड्ड्यावर सापडली अल्पवयीन मुलगी

0

नागपूर ,दि.22: गुन्हे शाखा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करवून घेणाऱ्या तीन आरोपींना पकडले.पोलिसांना वैशालीनगर येथील नासुप्रच्या मैदानाजवळील एका घरात देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला. देह व्यापार सुरु असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी धाड टाकली. या अड्ड्याची प्रमुख नीलेश अंतू कुडकी आणि त्याची नातेवाईक सारिका बच्चू कुडकी यांना अटक केली. तसेच दोघांनाही ग्राहक उपलब्ध करून देणाऱ्या लालचंद खरपत यादव यालाही पकडले. 
यादव हा नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करतो. नीलेश व सारिका घर भाड्याने घेऊन ग्राहकांना जागा उपलब्ध करून देत होते. दोघेही झारखंडचे राहणारे आहेत. त्यांच्याजवळ एक अल्पवयीन मुलगी सुद्धा सापडली. आरोपींच्या विरुद्ध पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या मार्गदर्शनात हवालदार गोपाल वैद्य, नायक शिपाई मनोज सिंह चव्हाण, अजय ठाकूर प्रफुल्ल बोंद्रे यांनी ही कारवाई केली. 

ड्रामाची मागणी : बंद लोखंडी गेट सुरू करा

0

गोंदिया ,दि.22-: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. परंतु रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोखंडी कटघरे व बंद असलेल्या लोखंडी गेट यामुळे प्रवाशांना लांब अंतर पायी चालत जावून स्थानकात प्रवेश करावा लागतो.

गोंदिया रेल्वे स्थानकात दरवर्षी कोट्यवधी रूपयांच्या तिकिटा विक्री होतात. लाखो रूपये विशेष तपास अभियानांतर्गत रेल्वेला उपलब्ध होतात. परंतु प्रवासी सुविधांच्या नावावर अडचणी तयार करण्यात रेल्वेचे अधिकारी कुशल आहेत, असा आरोप ड्रामाने (डेल्वी रेल्वे मुव्हर्स असोसिएशन) केला आहे.

बाजारा परिसराच्या रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वाराला लोखंडी पाईपने बेरिकेटिंग करण्यात आले आहे. चारही बाजूंना लोखंडी मोठमोठे पाईप लावून अडचणी निर्माण केल्या आहेत. गोंदियामध्ये लोखंडी गेट लावून कार, आॅटो, रिक्षा व इतर प्रवासी वाहनाने आपले लगेज घेवून पोर्चपर्यंत जावू दिले जात नाही. गोंदियात लोखंडी बेरिकेट्सशिवाय मोठे लोखंडी गेट लावण्यात आले आहेत. हे गेट नेहमीच बंद असतात. वृद्ध, महिला व बालकांना पोर्चपासून दूर अंतरावर उतरावे लागते. तसेच धावत जावून व पाईपवरून उडी घेवून आपला लगेज घेवून जावे लागते. जर पाऊस येत असेल तर आणखी समस्या उत्पन्न होते. अनेकदा रेल्वे अधिकारी व संसद सदस्यांना याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यांनी लक्ष न दिल्याने जनतेला समस्या सहन करावी लागत आहे.ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी रेल्वे प्रशासनाला पुन्हा निवेदन दिले आहे. त्यात दोन्ही लोखंडी गेट मार्गावरून हटविण्याची मागणी आहे.

BCCI च्या निवड समितीच्या अध्यक्षपदी एमएसके प्रसाद

0

वृत्तसंस्था

मुंबई,दि.21 भारताचा माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसादची बीसीसीआयच्या नव्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 41 वर्षीय प्रसाद याआधी दक्षिण विभागाचा प्रतिनिधी म्हणून संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा सदस्य होता.पाटील यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यावर प्रसादला त्याजागी बढती मिळाली.प्रसादने सहा कसोटी आणि 17 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले होते. बीसीसीआयच्या वार्षिक सभेत प्रसादची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

दरम्यान, मध्य विभागाच्या गगन खोडानं निवड समितीतलं स्थान कायम राखले. तर पूर्व विभागातून देवांग गांधी, पश्चिम विभागातून जतीन परांजपे आणि उत्तर विभागातून शरणदीप सिंगची निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादला ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. ज्युनियर निवड समितीत राकेश पारिख, ग्यानेंद्र पांडे, अमित शर्मा आणि आशिष कपूरचा समावेश आहे.बीसीसीआयच्या सचिवपदी अजय शिर्के यांची बिनविरोध निवड झाली आहे. सचिवपदासाठी केवळ एकच अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात होती.