34.5 C
Gondiā
Monday, May 19, 2025
Home Blog Page 5690

अखेर कंत्राटी अभियंता रूपेश दिघोरेंचे निधन

0

नागपूर- कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता यांचा गेल्या ५ तारखेला अपघात झाला होता. आज दुपारी नागपूरच्या होकार्ट रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
सविस्तर असे की, रूपेश दिघोरे हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अंतर्गत कुरखेडा तालुक्यात गेल्या १० वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत होते. गेल्या पाच तारखेला कुरखेडा तालुक्यातील चिनेगाव या साईटवरून घरी परतत असताना त्यांच्या गाडीला एका भरधाव दुचाकीने धडक दिली. गडचिरोली जिल्ह्यात अपुèया वैद्यकीय सेवेमुळे दिघोरे यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना नागपूरच्या होकार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उशीर झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय कापावा लागला होता. पोटाला जबर दुखापत झाल्याने त्यांचेवर तीनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम होऊन त्यांना डायलिसिस वर ठेवण्यात आले होते. अखेर १८ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचेवर काळाने झडप घातली.
उल्लेखनीय म्हणजे त्यांना उपचारासाठी तब्बल १७ लाखाचा खर्च आला. त्यापैकी ५ लाखाची मदत प्रधानमंत्री सडक योजनेतील कंत्राटी कर्मचारी संघटनेने केली. परंतु, शासनाने त्यांना काडीचीही मदत केली नाही, ही शोकांतिका आहे. दिघोरे यांच्या मागे एक सहा वर्षाचा मुलगा, पत्नी व आईवडिलांच्या संगोपनाची जबाबदारी होती. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसारख्या योजना या अल्प मानधनावर कंत्राटी अभियंत्याकडून राबविल्या जातात. परंतु, त्यांच्या वैद्यकीय सुविधांची शासन कसलीही दखल घेत नाही, याचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन उद्यापासून

0

गोंदिया- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी उद्या (ता.२४) पासून काळ्या फिती लावून कामकाज करीत शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे.
दुर्गम भागातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे काम आरोग्यसेवक करीत असतात. परंतु, त्यांची सेवा उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी कमी पडते. ग्रामीण भागात गरोदर महिला, बालके, प्रसूती झालेल्या महिला आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी २००५ पासून संपूर्ण राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जात आहे. या कर्मचाऱ्यांचे २००६ पासून मासिक मानधन अत्यल्प आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. नोकरीत कायम करण्यात येईल, या आशेवर हे कर्मचारी काम करीत आहेत. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे कर्मचारी-अधिकारी उद्या काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधणार आहेत.

अॅड.रहागंडाले मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा-अॅड चव्हाण

0

गोरेगाव,दि.23-सडक अर्जुनी तालुक्यातील वरिष्ठ वकील समाजसेवी अॅ़ड.मुकेश देवनाथ रहागंडाले यांचा काल सोमवारला झालेला मृत्यू संशयास्पद वाटत असून याप्रकरणाची सखोल चौकशी सीआयडी मार्फेत करण्यात यावी अशी मागणी वरिष्ट अधिवक्ता आणि गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अॅड.पी.सी.चव्हाण यांनी केली आहे.चव्हाण यांनी म्हटले आहे की,अॅड.रहागंडाले यांचा मृत्यू हा बार काॅन्सिलकरीता सुध्दा धक्कादायक असून आज जेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी सडक अर्जुनी येथे गेलो असता तेथील वातावरण आणि परिसरातील जनतेमध्ये असलेल्या चर्चा बघून त्यांचा मृत्यू हा अाकस्मिक वाटत नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी सीआयडी मार्फेत होणे आवश्यक आहे.

गोंदिया रुग्णालय प्रश्नावर आ.रवी राणांची आरोग्यमंत्र्याशी चर्चा

0

गोंदिया(berartimes.com)दि.२3 -गोंदिया जिल्हा युवा स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे व त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेल्या भीक मांगो आंदोलनाची माहिती आणि आंदोलकाची परिस्थिती यासर्व बाबींची माहिती आ.राणा यांना जितेश राणे यांनी भ्रमणध्वनी करुन सविस्तरपणे सांगितले.तसेच गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या या आंदोलनातील प्रत्येक बाबीसंबंधीचे पत्र,बातम्यांचे कात्रण त्यांना पाठवून आरोग्यविभाग कशाप्रकारे दुर्लक्ष करीत असल्याची माहीती दिली.त्यानुसार सामान्य कुवर तिलकसिंह रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या विविध समस्यांना घेऊन सुरु असलेल्या आंदोलनातील मुद्यांना घेऊन आज (दि.२3) युवा स्वाभीमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांनी मंत्रालयात आरोग्य मंत्री डाॅ.दिपक सावंत यांच्याशी चर्चा करुन त्वरीत समस्या न सोडविल्यास मंत्रालयासमोर आंदोलनाचा ईशारा दिला.
आ.राणा यांनी दिलेल्या निवेदनातील प्रत्येक मुद्याची सविस्तर चर्चा करुन नागपूर विभागाचे प्रभारी आरोग्य उपसंचालक डाॅ.फारुकी यांना दुरध्वनीकरुन तातडीने गोंदियातील आरोग्य समस्या सोडविण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.तसेच जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यानाही फोन करुन आरोग्यमंत्र्यांनी केटीएस व बीजीडूब्लूमधील समस्या त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश दिले.त्यातच सोमवारला युवा स्वाभीमानच्यावतीने भीक मांगो आंदोलन करुन गोळा केलेला निधीचा धनादेश जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी यांनी तो धनादेश न स्विकारता आरोग्य उपसंचालकालाच देण्यास युवा स्वाभीमानच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या समस्याना घेऊन सामाजिक कार्यकर्ते बंसत ठाकूूर यांनी 14 आॅगस्टपासून हे आंदोलन सुरु केले असून या आंदोलनाला युवा स्वाभीमान संघटनेने पाठिबां देऊन रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार जिल्ह्यात असतानाही आमदार रवी राणा यांना या मागणीसाठी पुढाकार घेऊन आरोग्यमंत्र्यांना खडे बोल सुनावण्याची वेळ आली.आ.राणा यांच्या मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मात्र जिल्हा शल्यचिकित्सकासह सर्वच अधिकारी रुग्णालयातील समस्या तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत.

अर्जुनी मोर पोलीसांनी पकडली लाखोंची दारू

0

अर्जुनी मोरगाव,दि.23:-पोलीस ठाणेतर्गंत येणार्या इटखेडा गावाजवळ महिंद्रा स्कार्पिओ गाडीसह ३५ पेट्या अवैध दारूची वाहतुक करतांना आरोपींना वाहनासह सोमवारच्या रात्री १२ ते ९ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आळी.या वाहनात ३५ पेट्या गोवा स्पेशल व्हिस्की किंमत १ लाख ७ हजार ५२० रू व महिंदा्र स्कार्पिओ गाडी नं. एम.एच. ३५ एम १४९ किमंत ४ लाख असा एकूण ५ लाख ७ हजार ५२० रूपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हा ३.६०३९ /१६ कलम ६५, ७७ अ.म.ढा.का. नुसार गुन्हा दाखल करून आरोपी महेंद्र उपेंद्रसिंग ठाकूर, प्रसन्न संजय कुंभलकर दोन्ही रा. वाजपेयी वार्ड श्रीनगर गोंदिया यांना अटक करण्यात येवून कोर्टात आरोपींना हजर करण्यात आले आहे. सदर कारवाई नामदेव बजरंग यांच्या मार्गदर्शनात पो. उपनिरीक्षक संदीप पाटील, पो.हवाा. फलेंद्र गिरी, नापोशि येर, मुकेश फुलबांधे,पो. घनश्याम मुळे पुढील तपास करीत आहेत.

देवरीचे ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर

0

आदिवासी भागात आरोग्यसेवेची हेळसांडः लोकप्रतिनिधी उदासीन

सुरेश भदाडे

देवरी – एकीकडे राज्यशासन ‘डॉक्टर आपल्या द्वारी’ सारख्या योजना राबवून आदिवासींसाठी अनेक योजना आणत असल्याच्या वल्गना करते. सत्तेतील लोकप्रतिनिधी सुद्धा अनेक विकास कामे खेचून आणल्याचा दावा करतात. दुसरीकडे, मात्र देवरी सारख्या आदिवासी तालुक्यातील आरोग्यसेवाच सलाईनवर ठेवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. देवरीच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी इतरत्र प्रतिनियुक्तीवर पाठवून आदिवासींच्या आरोग्यसेवेला पंगू केले जात आहे. दरम्यान, या भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा आरोग्यसेवेबाबत वरिष्ठ अधिकारी अन्यायाचे धोरण राबवीत असताना गप्प बसल्याने कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर देवरीचे ग्रामीण रुग्णालय आहे. तालुक्याचा विचार केला तर देवरी व चिचगड येथे दोन रुग्णालय आहेत. याशिवाय देवरीच्या रुग्णालयात ट्रामा सेंटरची सुद्धा सोय आहे. या रुग्णालयात दररोज १५०-२०० बाह्यरुग्णांची तपासणी व औषधोपचार होत असल्याची माहिती वैद्यकीय वर्तुळातून दिली जाते. या रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग हा नेहमीच हाउसफुल्ल असतो. राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णालय असल्याचे येथे अपघातातील जखमी सुद्धा औषधोपचारासाठी आणले जातात. याशिवाय देवरीपासून साकोली व आमगाव वगळता शवविच्छेदनाचे कार्य एकट्या देवरी येथे उपलब्ध आहेत. शिवाय फौजदारी प्रकरणातील रुग्णांचा भार सुद्धा या रुग्णालयाला पेलावा लागतो. याशिवाय तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रियेची जबाबदारीसुद्धा याच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते.
रुग्णालयाचा हा संपूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५ पदे ही कागदोपत्री भरलेली आहेत. या पाच पदांपैकी दोन वैद्यकीय अधिकारी हे उच्चशिक्षणासाठी तर उर्वरित दोन वैद्यकीय अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी डॉ. भोंगाडे यांना चिचगड येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. चिचगडचे डॉ. खरोले हे रजेवर गेले असून त्यांचे परत रुजू होण्यावर शंका व्यक्त केल्या जात आहेत. दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुल्हाणे यांना नवेगाव येथील रुग्णालयाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा पातळीवरून नेहमीच वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीवर देवरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतरत्र हलविण्याचा प्रकार काही नवीन नाही. महत्त्वाचे म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या तिरोडा येथील रुग्णालयापेक्षा देवरी रुग्णालयावर कामाचा ताण अधिक आहे. याशिवाय हा तालुका जंगलव्याप्त असल्याने व इतर भागातून स्थलांतरित रुग्णांचा लोढा जास्त असल्याने या तालुक्यातील आरोग्य सेवेवर नेहमीच ताण असतो.
सध्यःस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. दीपक धुमनखेडे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी सेवेत असून प्रशासकीय कामासोबत त्यांना रुग्णांना सेवा देखील पुरवावी लागत आहे. याशिवाय आंतररुग्ण विभाग, शवविच्छेदन, शस्त्रक्रिया एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर अवलंबून आहे. सदर तालुका हा अतिदुर्गम आणि जंगलव्याप्त आहे. येथे रस्ते अपघातांचे प्रकारसुद्धा अधिक आहेत. त्यामुळे या रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे.
असे असताना देवरीसह सालेकसा व आमगाव येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वानवा आहे. त्यामुळे आदिवासी भागातील आरोग्यसेवेला वेठीस धरण्याचा तर हा प्रकार नसावा, अशी शंका व्यक्त होत आहे. या प्रकाराबद्दल लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प बसल्याने नागरिकांनी कुणाकडे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आ.व़ड्डेटीवारांच्या हस्ते सिमेंट कॉक्रिट रोडचे भूमिपूजन

0

ब्रम्हपुरी,दि.23-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील पारडगाव येथे स्थानिक आमदार निधिमधून अंदाजे 3 लक्ष रु. किंमत असलेले सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन मतदारसंघाचे आमदार व विधीमंडळ काँग्रेस आय पक्षाचे उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
आमदार वडेट्टीवार पुढे बोलतांना म्हणाले की ब्रम्हपुरी क्षेत्राचा संर्वागीन विकास करण्यासाठी मी कटीबद्ध असून ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ता, समाज मंदीर, बौद्ध विहार, नाली बांधकाम या बांधकामास प्राधान्य देवून पुर्णत्वास नेण्यास कृती आराखडा केलेला आहे.पारडगाव येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजनप्रसंगी जि.प.चे माजी सभापती तथा सदस्य प्रा.राजेश कांबळे, उमेश धोटे, सरपंच दादाजी ढोरे, उपसरपंच, सदस्य तथा नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जावडेकर म्हणतात, नेहरू व पटेल गेले फासावर

0

वृत्तसंस्था
छिंदवाडा (मध्य प्रदेश)- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल हे देशासाठी फासावर लटकले, असे म्हणत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अकलेचे तारे तोडले. जावडेकरांच्या या वक्तव्यानंतर नेटीझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वातंत्र्यावर बोलताना इतिहासच बदलून टाकला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरुंचा प्रकाश जावडेकरांनी शहीद म्हणून उल्लेख केला. जावडेकर एवढ्यावरच थांबले नाही तर ते फासावर चढले होते असंही म्हणाले आहेत.

मध्यप्रदेशमधील छिंदवारा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत प्रकाश जावडेकर बोलत होते. ‘स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये लढ्याला सुरुवात झाली. 90 वर्षांनी लढा संपला आणि आपण ब्रिटिशांना देशातून बाहेर काढलं. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु, भगत सिंग आणि राजगुरु यांच्यासहित ते सर्व जे फासावर चढले, त्या सर्व शहिदांना मी सलाम करतो’, असं वक्तव्य प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.

हरणखुरी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0

वर्धा, दि. २३ – शेतकरी आत्महत्येचे सत्र अजुनही थांबलेले नसून समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी येथील तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातच कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. वसंता गंगाराम उईके, वय 3५ या मृत शेतक-याचे नाव असून त्याच्याकडे १० एकर शेती असून बँकेचे कर्ज आहे. सततच्या नपाकीने तो त्रस्त होता. अशातच यावर्षी शेतातील उभे पीक जंगली श्वापदांनी फस्त केले . कर्जाचा वाढता डोंगर आणि हाती आलेले पीक गेल्यामूळे चिंतातूर असलेल्या वसंताने स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन केले.बाजुच्या शेतातील शेतकऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोउपचारानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्याम त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

देवरी महिला भाजपचे देवरी पोलिस ठाण्यात रक्षाबंधन

0

देवरी- दरवर्षी प्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या तालुका महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देवरी पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोमवारी (ता.22) राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
यावेळी भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या सदस्या सविता पुराम,तालुका अध्यक्ष नूतन कोवे, सभापती देवकी मरई,महामंत्री शोभा शेंडे, अनिता चन्ने,नमिता नेताम, प्रज्ञा संगीडवार, माजी जि.प. सदस्या गोमती तितराम, रचना उजवणे आदी सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, ठाणेदार राजेश तटकरे यांनी पोलिसांवर दाखविलेल्या विश्वासाबद्दर पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.