जावडेकर म्हणतात, नेहरू व पटेल गेले फासावर

0
6

वृत्तसंस्था
छिंदवाडा (मध्य प्रदेश)- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल हे देशासाठी फासावर लटकले, असे म्हणत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अकलेचे तारे तोडले. जावडेकरांच्या या वक्तव्यानंतर नेटीझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वातंत्र्यावर बोलताना इतिहासच बदलून टाकला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरुंचा प्रकाश जावडेकरांनी शहीद म्हणून उल्लेख केला. जावडेकर एवढ्यावरच थांबले नाही तर ते फासावर चढले होते असंही म्हणाले आहेत.

मध्यप्रदेशमधील छिंदवारा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत प्रकाश जावडेकर बोलत होते. ‘स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये लढ्याला सुरुवात झाली. 90 वर्षांनी लढा संपला आणि आपण ब्रिटिशांना देशातून बाहेर काढलं. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु, भगत सिंग आणि राजगुरु यांच्यासहित ते सर्व जे फासावर चढले, त्या सर्व शहिदांना मी सलाम करतो’, असं वक्तव्य प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.