वाशिम, दि. ८ ऑक्टोबर – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग (गट) तसेच पंचायत समिती निर्वाचक गण निहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस-२०२५/प्र.क्र.२०/ का-७ दिनांक २३ सप्टेंबर २०२५ अन्वये जाहीर करण्यात आला आहे.
या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तसेच संबंधित तहसील व पंचायत समिती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.तसेच जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सुचना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दाखल करता येणार असून, नागरिकांनी आपली हरकत किंवा सूचना संबंधित तहसीलदारांकडे दाखल कराव्यात. मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी तहसीलदारांना सोपविण्यात आली आहे.
तसेच, वाशिम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सहा पंचायत समित्यांच्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ नुसार अधिप्रमाणित करण्यात येतील. याद्या माहितीस्तव ठेवण्यात आल्याबाबतची सूचना दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी देखील वरील कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कळविले आहे.





