तिरोडा, ता. 3- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यांत निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी तिरोडा क्षेत्रात तातडीने उपाययोजना राबविण्यात आली आहे. आमदार विजय रहांगडाले यांच्या पुढाकारामुळे बुधवारी चोरखमारा जलाशयातून नाल्यात पाणी सोडण्यास सुरवात झाली असून, या निर्णयामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी तालुक्यातील गावांत उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तीव्र होते. विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोत कोरडे पडू लागल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार रहांगडाले यांनी प्रशासनाशी समन्वय साधून जलाशयातील पाणी नाल्याद्वारे सोडण्याचा निर्णय घेतला.या उपक्रमामुळे नाल्यालगतच्या परिसरातील विहिरी व जलस्रोतांची पातळी वाढण्यास मदत होणार असून, शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा काही प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता आहे. इतर पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच जनावरांच्या पाण्याच्या गरजाही भागण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





