25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ रिक्षा चालकांचे ८ एप्रिल रोजी आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

रिक्षा चालकांचे ८ एप्रिल रोजी आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

0
46

​गोंदिया: महाराष्ट्र राज्य सरकारने ऑटो रिक्षा चालकांसाठी स्थापन केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे रिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’च्या नावाखाली सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीविरोधात गोंदिया जिल्हा रिक्षा चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने येत्या बुधवार, दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
​संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू तिवारी यांनी सांगितले की, शासनाने रिक्षा चालकांच्या हिताचे नाव सांगून कल्याणकारी मंडळ स्थापन केले खरे, परंतु त्यासाठी कोणत्याही प्रमुख संघटनांशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय लादले आहेत. मंडळात नोंदणी करण्यासाठी प्रत्येक रिक्षा चालकाकडून ५०० रुपये प्रवेश शुल्क आणि ३०० रुपये वार्षिक शुल्क अशी एकूण ८०० रुपयांची वसुली केली जात आहे. ही वसुली पूर्णपणे बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
​याबाबत अधिक माहिती देताना महासचिव संदीप सरजारे यांनी संताप व्यक्त केला की, “परिवहन विभागाचे अधिकारी रिक्षा चालकांवर या शुल्कासाठी दबाव टाकत आहेत. जे चालक हे शुल्क भरत नाहीत, त्यांचे परमिट नूतनीकरण आणि पासिंग यांसारखी अत्यंत महत्त्वाची कामे रोखली जात आहेत. हा रिक्षा चालकांचा आर्थिक छळ असून प्रशासनाने ही दडपशाही थांबवावी.”
​संघटनेच्या प्रमुख मागण्या मध्ये
​कल्याणकारी मंडळाच्या नावाखाली घेतली जाणारी ८०० रुपयांची सक्तीची वसुली तात्काळ बंद करण्यात यावी.
​शुल्क न भरणाऱ्या चालकांची शासकीय कामे (पासिंग/नूतनीकरण) अडवून धरू नयेत.
​मंडळाच्या धोरणांमध्ये रिक्षा चालक संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा करण्यात यावी.
​या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संघटनेचे पदाधिकारी व सक्रिय सदस्य हेमराज तरोन, नरेन्द्र रामटेके, महेंद्र गडपायले, सुभाष भालाधारे, रसूल खान, राजेश सिंह, आबिद खान, अहेफ़ाज़ भाई, यशवंत हमने, सोनू पाटले, शक्ती गहेलोध, यशपाल नसीने, सिनु राव, तौफिक, विजु मंड्रे, कादर खान, राजा सैय्यद, संतोष मेंढे, विष्णू साठवणे, प्रमोद उके आणि शेखर राव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ऑटो रिक्षा चालक आणि मालकांना आवाहन करण्यात आले आहे की, या अन्यायाविरुद्ध ८ एप्रिल रोजी निघणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी.जोपर्यंत सरकार ही ‘जबरन वसुली’ बंद करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,असा इशाराही संघटनेने दिला आहे.