32.1 C
Gondiā
Wednesday, June 10, 2026
Home गुन्हेवार्ता रेतीने भरलेल्या टिप्परची धडक; पाच जण जखमी

रेतीने भरलेल्या टिप्परची धडक; पाच जण जखमी

0
67

गोंदिया ः तेढवा येथील घाटावरून वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत चार बालिका व एका ज्येष्ठ नागरिकासह पाच जण जखमी झाले. ही घटना काटी येथे बुधवारी (ता. १०) सकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला.
तेढवा येथील घाटावरून अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टिप्पर काटी-बघोली-मुरपार-रजेगाव मार्गावरून भरधाव वेगाने धावत असतात. बुधवारी (ता. १०) वाळूने भरलेल्या एका टिप्परने काटी गावात पाच जणांना धडक दिली. यात मीत राऊत, लोवंशी राऊत, वाणी राऊत, देवांशिका राऊत या चार बालिका तसेच छगनलाल राऊत (वय ६५) हे जखमी झाले. सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले. त्यानंतर गावातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या नेतृत्वाखाली अवैध उत्खनन व भरधाव वाहतुकीविरोधात रास्ता रोको आंदोलन केले.
पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, गेल्या आठवड्यातच काटी ग्रामपंचायतीने तेढवा वाळू घाट तसेच इतर ठिकाणांवरील अवैध उत्खनन आणि काटी-बघोली-मुरपार-रजेगाव मार्गावर भरधाव धावणाऱ्या टिप्पर व ट्रॅक्टरविरोधात कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.