गोंदिया,20: शासनाने निश्चित केलेल्या कमाल किरकोळ विक्री किमतीपेक्षा (MRP) अधिक दराने रासायनिक खताची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यात एका कृषी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ जून २०२६ रोजी झालेल्या नियमित तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
*नेमके प्रकरण काय?*
कृषी केंद्राचे नाव: मे. विनायक फर्टिलायझर्स, कामठा, ता. जि. गोंदिया (प्रो. प्रा. विनायक मुन्नालाल अग्रवाल).
उल्लंघन: या केंद्रावर मध्य भारत कंपनीच्या ’20:20:0:13′ या रासायनिक खताची विक्री छापील किमतीपेक्षा जास्त दराने केली जात असल्याचे आढळले.
फसवणूक: नवरगाव कला येथील शेतकरी श्री. शैलेश सुदाम उके यांनी हे खत 1800 रुपये दराने खरेदी केले होते. मात्र, खताच्या पोत्यावर कमाल किरकोळ किंमत (MRP) 1500 रुपये म्हणजेच 300 रुपये कमी नमूद होती.
पुराव्यांची जप्त: संबंधित शेतकऱ्याने खताचे पैसे ‘युपीआय’ (UPI) द्वारे ऑनलाईन अदा केल्याचे पुरावे तपासणी पथकाला दाखवले. तसेच, विक्रेत्याने शेतकऱ्याला खत खरेदीची कोणतीही पक्की पावती दिली नसल्याचेही तपासात उघड झाले.
*कायदेशीर कारवाई*
शासनाने अधिसूचित केलेल्या कमाल किमतीपेक्षा जास्त दराने खत विक्री करणे आणि पक्की पावती न देणे, हे ‘खत नियंत्रण आदेश १९८५’ व ‘अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ मधील तरतुदींचे थेट उल्लंघन आहे. यानुसार कृषी केंद्र चालकाविरुद्ध रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस विभाग करत आहे.
*वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथक*
सदर धडक कारवाई गोंदियाचे जिल्हाधिकारी मा. डॉ. मंगेश गोंदवले, नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मा. श्री. उमेश घाटगे आणि गोंदियाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. श्री. निलेश रामदास कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व कृषी विभागाच्या पथकाद्वारे करण्यात आली.
*कृषी केंद्र चालकांना कडक इशारा*
”सध्या बाजारामध्ये जुन्या दराचे अंदाजे 70\% खत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र धारकांनी खतांची विक्री केवळ शासनाने निश्चित केलेल्या कमाल किरकोळ किमतीनुसारच (MRP) करावी. प्रत्येक व्यवहाराची पक्की पावती शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. ‘खत नियंत्रण आदेश १९८५’ व ‘अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ चे उल्लंघन करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
00000





