27.6 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home राजकीय मतांची खरेदी केली नसल्यास गोळवलकरांची शपथ घ्यावी : काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे

मतांची खरेदी केली नसल्यास गोळवलकरांची शपथ घ्यावी : काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे

0
9
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी भाजपचे विजयी उमेदवार आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्यावर मतांची खरेदी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मतांची खरेदी केली नसल्यास माजी सरसंघचालक माधव गोळवलकर यांची शपथ घेऊन तसे जाहीर करावे, असे आव्हान गुडधे यांनी दिले.

मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल गुडधे म्हणाले की, भाजपमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याने तो पक्ष दुकानासारखा झाला आहे. एक दिवस या दुकानाचे शटर काँग्रेस नक्कीच बंद करेल. काँग्रेस हा सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा पक्ष असून आमच्यासाठी तत्त्वे आणि मूल्ये महत्त्वाची आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुडधे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचे शटर बंद करण्याची भाषा करणाऱ्यांनी वास्तव पाहावे. काँग्रेसचे शटर आधीच बंद झाले असून जनतेने त्यांना नाकारले आहे, अशी टीका त्यांनी केली. विधान परिषद निवडणुकीतील विजय हा भाजपच्या विकासकामांवर आणि जनतेच्या विश्वासावर मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत