25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Top News प्रजासत्ताकदिनी न.प. शाळेत शिक्षकांची मटनपार्टी

प्रजासत्ताकदिनी न.प. शाळेत शिक्षकांची मटनपार्टी

0
26

गोंदिया- देशात सर्वत्र ६६ वा प्रजासत्ताकदिन साजरा होत असताना गोंदिया नगर परिषदेच्या एका शाळेत मात्र शिक्षक-कर्मचाऱ्यांनी चक्क दारू ढोसून मटनपार्टी केल्याचा अश्लाघ्य प्रकार समोर आला आहे. दरम्यान, प्रसारमाध्यम प्रतिनिधी घटनास्थळी पोचताच या बहाद्दर शिक्षकांनी तेथून पळ काढला.
प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्रजासत्ताक दिवस आपापल्या पद्धतीने साजरा केला. असे असताना गोंदिया नगर परिषदेच्या माताटोली म्युनिसिपल हायस्कूल नगरपरिषद हिंदी/मराठी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर लगेच दारू आणि मटण पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये शाळेतील काही शिक्षक व कर्मचारी सहभागी असल्याचे चित्र बघावयास मिळाले. विशेष म्हणजे जेव्हा या शाळेत अशा प्रकारचा प्रकार सुरू असल्याची माहिती अतुल ददुरीया नामक युवकाने भ्रमणध्वनीवर पत्रकारांना दिली. तेव्हा शाळेच्या स्टोअर रूममध्ये ही पार्टी सुरू असल्याचे पत्रकारांना दिसून आले. पत्रकार पोचल्याचे लक्षात येताच काहींनी तिथून पळ काढला तर कर्मचारी मात्र तिथेच राहिले.
शाळेत पार्टी झोडणाऱ्यांमध्ये रवी शर्मा, विनोद टेंभूर्णे, इरशाद व इतर पाच ते सहा शिक्षक ह्या जागी उपस्थित होते. पवित्र विद्यामंदीराला काळिमा फासणाèया या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी दिली.
या घटनेची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना देण्यात आली होती. परंतु, सीईओनी घटनास्थळावर प्रशासनिक अधिकारी राणे यांना पाठविले. त्यांनीही प्रत्यक्ष शाळेतील मटनपार्टीची जागा आणि ज्याठिकाणी शिजविण्यात आले त्या जागेची खातरजमा केली.
दरम्यान, नगरसेवक घनश्याम पानतावणे यांनी पालिकेच्या शाळेची अवस्था अत्यंत वाईट असल्याचा आरोप केला. २६ शाळांपैकी १३ शाळा बंद असून एका शाळेत ५० विद्यार्थ्र्यांसाठी ९ शिक्षक असल्याची टीका करीत शिक्षणाकडे आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने असा प्रकार करण्याची हिंमत या शिक्षक कर्मचारीमध्ये आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी नगरसेवक संजय आहुजा यांनी सुद्धा घडलेल्या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.