24.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहा- डॉ.कविता मदान

तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहा- डॉ.कविता मदान

0
28

गोंदिया,दि.६ : तंबाखू सेवनामुळे शरिरावर अनेकप्रकारचे दुष्परिणाम होतात. कारण तंबाखूमध्ये निकोटीन हा हानीकारक पदार्थ असतो. त्यामुळे प्रत्येकाने तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे व निरोगी आयुष्य जगावे. असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंतचिकित्साशास्त्र विभागाच्या डॉ.कविता मदान यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव एम.बी.दुधे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दंतशल्यचिकित्सक ममता सरोदे, डॉ.शैलेश कुकडे, डॉ.दिपाली कोल्हटकर व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सविता बेदरकर यावेळी उपस्थित होत्या.
डॉ.मदान पुढे म्हणाल्या, भारत तंबाखू उत्पादनामध्ये व तंबाखू सेवन करण्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तंबाखू पदार्थात जवळपास २८ कर्कजनक रसायने असतात, जी शरिराला अत्यंत हानीकारक असतात. तंबाखूमध्ये असलेला निकोटीन हा घटक पदार्थ अत्यंत विषारी समजला जातो, जो मानवी शरिराला उत्तेजीत करतो. अमेरिकेत झालेल्या एका सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार तंबाखूच्या वापरामुळे शरिरातील जवळपास सर्व अवयवांवर घातक परिणाम होवून विविध आजार होतात व त्यामुळे संपूर्ण आरोग्य धोक्यात येते. आज जगामध्ये १० मधील १ प्रौढ माणसाचा मृत्यू हा तंबाखू सेवन केल्याने होतो. तसेच जगामध्ये दरवर्षी जवळपास ६० लक्ष लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनाने होतो असे त्यांनी सांगितले.
श्रीमती सरोदे म्हणाल्या, तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने विविध प्रकारचे आजार आपल्याला होवू शकतात. तंबाखू सेवन हे जगामधील मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरले आहे. सन २००४ च्या भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो. तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा (उजढअझअ)२००३ तयार करण्यात आला. हा कायदा भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे नियंत्रण करतो असे त्या म्हणाल्या.
डॉ.कुकडे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच तंबाखू प्रतिबंध बाबत विविध कायदयाची माहिती सांगितली आहे. या कायदयाचे उल्लंघन केल्यास व्यक्तीस २०० रुपये दंड आकारण्याची तरतूद कायदयात आहे. तसेच १८ वर्षाखालील व्यक्तीस तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय अपराध समजला जातो असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.सी.ठवकर, पी.एन.गजभिये, एल.पी.पारधी, ए.जे.नंदेश्वर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.एम.पी.चतुर्वेदी यांनी केले. उपस्थितांचे आभार ॲड.अर्चना नंदघळे यांनी मानले.

blank