ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कासाठी कायदयाचा आधार घ्यावा- न्या.वासंती मालोदे

0
15

गोंदिया,दि.६ : आजची तरुण पिढी कुटूंबातील ज्येष्ठ नागरिकांना, आई-वडिलांना सन्मानाची वागणूक देत नाही. आजच्या पिढीला वयस्कर आई-वडील नकोसे, बोझ वाटतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगणे कठीण होत असते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे हिताचे संरक्षण करण्यासाठी नवीन कायदे तयार करण्यात आले आहे. ज्या पिडीत व्यक्तींना न्याय पाहिजे असल्यास त्या व्यक्तीने कायदयाचा आधार घ्यावा, जेणेकरुन त्यांना सुखमय जीवन जगता येईल. असे प्रतिपादन न्यायाधीश वासंती मालोदे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व ज्येष्ठ नागरिक संघ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव एम.बी.दुधे, ॲड.बिणा बाजपेई, ॲड.टी.बी.कटरे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सविता बेदरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे मधुकर नखाते यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्रीमती मालोदे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांनी आपण एकटे असण्याची भावना मनात बाळगू नये. आपल्या पाठीशी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे. प्रत्येक व्यक्तीला म्हातारपण येणारच. व्यक्ती विचारांनी कमजोर होत नाही तर शरिराने कमजोर होत असतो असे सांगितले.
ॲड.बाजपेयी यांनी नागरिकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्य याबाबत माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात नोकरीकरीता जातात व त्यांचे ज्येष्ठ नागरिक असलेले आई-वडील एकटे राहतात त्यामुळे अशा आई-वडिलांकडे दुर्लक्ष होते. अशावेळी वृध्दाश्रमात जावून आपले एकटेपण दूर करता येवू शकते. श्रीमती बेदरकर यांनी संयुक्त कुटूंबामुळे विकास होतो, परंतू आज संयुक्त कुटूंब पध्दती ही ऱ्हास पावली आहे. प्रत्येक व्यक्तीनी सहकार्याची भावना ठेवून त्यांना मदत करावी असे सांगितले. तसेच ॲड.कटरे यांनी सुध्दा ज्येष्ठ नागरिकांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.सी.ठवकर, पी.एन.गजभिये, एल.पी.पारधी, ए.जे.नंदेश्वर, गुरुदयाल जैतवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन ॲड.अर्चना नंदघळे यांनी केले. उपस्थितांचे आभार ॲड.प्रणिता कुलकर्णी यांनी मानले.