24.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ १५ जूनपूर्वी जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करा

१५ जूनपूर्वी जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करा

0
31

भंडारा दि.६ :शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची २0१७-१८ मध्ये सर्व कामे १५ जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. केलेल्या कामाचे जिओ टॅगिंग व ऑनलाईन अहवाल तातडीने भरावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि..५) जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवन संरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक एस.एस. लोखंडे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, अर्चना मोरे, सर्व तहसिलदार व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान सन २0१६-१७ अंतर्गत कामाचा व खर्चाचा तसेच ऑनलाईन आढावा, २0१७-१८ अंतर्गत कामाच्या प्रगतीचा आढावा व २0१८-१९अंतर्गत गाव निवडीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. सन २0१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात आलेली सर्व कामे यंत्रणेने पूर्ण केली आहेत. सन २0१६-१७ मध्ये ५९ गावात १७२१ कामे करण्यात आली. ५९ गावे जलपरीपूर्ण झाली असून या कामांमुळे २१ हजार ९५९ टीसीएम पाणी साठा निर्माण झाला असून यामुळे १६ हजार ६१४ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. या कामाबद्दल जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले.
सन २0१७-१८ मध्ये ५६ गावांची निवड करण्यात आली असून एकूण प्रस्तावित कामांची संख्या १३७५ आहे. यापैकी १२६१ कामे सुरु झाली असून उर्वरित कामे १५ जून पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यात. जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्री यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कामे प्रलंबित ठेवणार्‍या कंत्राटदारांना काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठवावा. कुठल्याही परिस्थितीत ऑनलाईन अहवाल तातडीने भरावा, असे ते म्हणाले. या सर्व कामांचा उपविभागीय अधिकार्‍यांनी वारंवार आढावा घ्यावा. भंडारा जिल्ह्यासाठी प्रशासनाने व्हिजन डॉक्युमेंट तयार केले असून यावर आधारित काम करावे, असे ते म्हणाले. रोजगार निर्मिती शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ, भाजीपाला क्लस्टर, रेशिम विकास, आरोग्य व शिक्षण आणि जल व जंगल संवर्धन आदींचा याव्हिजन डॉक्युमेंटमध्ये समावेश असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. रोहयोचे सर्व कामे पाणलोट क्षेत्रावर आधारित घेण्यात यावी, असे ते म्हणाले. कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी कृषी विमा योजनेचा प्रसार, प्रचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्या प्रत्येक तालुक्यातील २0 गावे असे एकूण ७ तालुक्यात १४0 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात जलयुक्त शिवारची कामे करतांना पाणलोट क्षेत्र विकास हा मुख्य बिंदू मानून कामे करण्यात यावी, यासोबतच प्रत्येक तालुक्यात किमान एक काम नाविण्यपूर्ण व उत्कृष्ट असावे, यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सूचविले.

blank