
सिरोंचा(अशोक दुर्गम),दि.7ः-स्थानिक पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या अमरावती व असरअल्ली पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या रंगधामपेठा येथील अवैध दारू अड्ड्यांवर सिरोंचा व असरल्ली आज ६ जून रोजी धाड लाखो रूपयांचा दारू साठा नष्ट केला. अमरावती- येथे बर्याच दिवसांपासून अवैध दारू निर्मितीचे अड्डे सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाला मिळाली होती. गावात अवैध दारू निर्मिती करून गावात व सिरोंचा परिसरातील गावात अवैध दारूचा पुरवठा केला जात होता. अमरावती येथे दारू निर्मितीमुळे गावाशेजारील गावांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या आदेशानुसार प्रभारी ठाणेदार पतंगराव कदम, उपपोलिस निरीक्षक आनंद टेकाम यांनी मुक्तीपथचे जिल्हा उपसंचालक संतोष सावलकर, तालुका संघटक किशोर मलेवार, महेंद्र सदनपू, संतोष चंदावार यांच्यासह अमरावती गावात शोधमोहीम राबवून २0 घरी धाड टाकली. यामध्ये जवळपास २ ते ३ लाखांचा दारूसाठा नष्ट करून अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात आली.
रंगधामपेठा – सिरोंचा तालुक्यातील अवैध दारूविक्रीमुळे गावातील तरूण व्यसनाधीन होवून गावागावात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली होती. गावातील अवैध दारूविक्री व दारू पिण्याच्या प्रमाणामुळे शांतता व सुव्यवस्था भंग पावत होती. त्यामुळे असरअल्ली पोलिस ठाण्याच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या आदेशानुसार ठाणेदार रामेश्वर दराडे यांच्या सुचनेनुसार उपपोलिस निरीक्षक नितीन गट्टू यांच्या मार्गदर्शनात मुक्तीपथचे तालुका संघटक किशोर मलेवार, महेंद्र सनदपू यांच्या उपस्थितीत रंगधामपेठाचक येथे जंगल परिसरात ३ अवैध दारू अड्ड्यांवर धाड टाकून ५0 ड्रम दारूसाठा नष्ट करण्यात आला.या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेते व अवैध दारू काढणार्यांचे धाबे दणाणले आहेत.





