
गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.02ः- एटापल्ली तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा व इतर मागण्यांना घेऊन १ नाव्हेंबरला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विधानसभेचे उपगटनेते, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकार्यांमार्फतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
एटापल्ली तालुका अतिदुर्गम मागास व संवेदनशील असून रोजगारविरहित आहे. चालू शेती हंगामात पाऊस कमी पडल्याने धानपीक करपून गेले आहे. खर्चाइतकेही उत्पादन झालेले नाही. त्यामुळे शेतकर्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच मदत म्हणून तालुका कोरडा दुष्काळ घोषित करून उपजिवीकेसाठी प्रत्येक कुटुंबाना अन्न-धान्य उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर कमी करावे, रेशनची अनुदान रक्कम न देता धान्य वितरण करावे, प्रलंबित वनहक्क दावे त्वरित मंजूर करावे, स्थानिकांना रोजगार निर्मिती करावी, वृध्दापकाळ व निराधार योजनेचे मानधन ९00 रुपयांनी वाढवावे, नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना घरकूल, शेततळे, सिंचन विहिरीचा लाभ द्यावा, धान खरेदी केंद्रे सुरू करावीत, तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती व निर्मिती करावी, गट्टा व कसनसूर येथील मंजूर ३३ केव्ही विद्युत केंद्र सुरू करावे, वाळू घाटाचा लिलाव करावा, तेंदूपत्ता मजुरांची थकित महसुली रक्कम मिळवून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी उपविभागीय अधिकार्यांमार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
मोर्चात जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी सरचिटणीस सगुणाताई तलांडी, जि.प. सदस्य अँड. राम मेर्शाम, जि.प. सदस्य तथा तालुका अध्यक्ष संजय चरडुके, पं.स. सदस्य शालित गेडाम, नगराध्यक्षा दीपयंजी पेंदाम, उपाध्यक्ष रमेश गंपावार, पेंटा रामा तलांडी, डॉ. नितीन कोडवते, संगिताताई मडावी यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





