गोंदिया ,दि.16ः-जनावराचा गोठा मंजूर करवून देण्यासाठी लाभार्थ्यांच्या मुलाकडून ७ हजारांची लाच घेणार्या तिरोडा तालुक्यातील सिल्ली ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवकाला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार, १५ जानेवारी लाच घेताना रंगेहाथ पकडले. योगराज कन्हैय्यालाल पटले ऊर्फ योगेश असे लाचखोर रोजगार सेवकाचे नाव आहे.
तक्रारकर्ता हा मजूर असून त्यांच्या वडिलांचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनारांच्या गोठा मंजुरीच्या लाभार्थी यादीत समाविष्ठ होते. सदर गोठा मंजुरीचा प्रस्ताव तयार करून तो पंचायत समिती तिरोडाकडे पाठवून गोठय़ाला मंजुरी मिळवून देण्यासाठी रोजगारसेवक योगराज पटले याने १४ जानेवारी रोजी तक्रारकर्त्यांकडे ७ हजार रुपयांची लाच मागितली. परंतु तक्रारकर्त्यांची लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केला. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सिल्ली ग्रामपंचायतीमध्ये सापळा रचून योगराज पटले याला तक्रारकर्त्यांकडून ७ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. आरोपी पटले याच्यावर तिरोडा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई नागपूर एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवारे यांच्या मार्गदर्शना पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, पोलिस हवालदार राजेश शेंद्रे, नायक पोलिस शिपाई रंजीत बिसेन, दिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, देवानंद मारबते यांनी केली.





