37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ प्रकल्पग्रस्तांचा आंदोलन चिरडण्यासाठी पोलीसांचा बळाचा वापर!

प्रकल्पग्रस्तांचा आंदोलन चिरडण्यासाठी पोलीसांचा बळाचा वापर!

0
19

blank

चंद्रपूर,दि.25ः-अंबुजा व्यवस्थापन व गडचांदूर पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संतापलेल्या अंबुजा प्रकल्पग्रस्त आदिवासी व इतर शेतकर्‍यांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात २४ जून रोजी अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. महसूल विभागाचे सहसचिव यांचेशी चर्चा करून ठोस कारवाईचे लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका देशमुख व इतर प्रकल्पग्रस्तानी घेतली. परंतु पोलिसांनी शांततेने आंदोलन करणार्‍या महिला व पुरुषांना जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करीत आदिवासी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिरडले.
यात प्रकल्पग्रस्तांसोबत जन विकासच्या अनेक पदाधिकार्‍यांवर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना अटक केली. जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील एक वर्षापासून अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने अंबुजा व्यवस्थापनाने भूसंपादन कराराचा भंग केल्यामुळे व्यवस्थापना विरुद्ध कारवाई करावी, अशा प्रकारचा प्रस्ताव सहसचिव महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठविला आहे. परंतु, आजपर्यंत या प्रस्तावाच्या अनुषंगाने सहसचिव महसूल विभाग यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच १ महिन्यापूर्वी सर्व आदिवासी प्रकल्पग्रस्तांनी फसवणूक झाल्याची लेखी तक्रार करून अंबुजा व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये केलेली होती. मात्र, दोन्ही प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

या दिरंगाईमुळे संतापलेल्या अंबुजाचे प्रकल्पग्रस्त आदिवासी व इतर शेतकर्‍यांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात दि. २४ जून रोजी अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दुपारी बारा वाजेपासून अंबुजा गेटवर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तीन वाजेपयर्ंत आंदोलनाच्या मागण्याबाबत कोरपण्याचे नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्याशी चर्चा केली व जिल्हाधिकार्‍यांनी महसूल विभागाच्या सचिवांना स्मरण पत्र पाठवून आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, सदर प्रकरणात तीन महिन्यापासून कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे सहसचिवांशी चर्चा करून तातडीने ठोस कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका देशमुख व आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी घेतली. शांततेने सुरू असलेल्या या आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनावर दुपारी साडेतीनच्या सुमारास कोरपना उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यामावार, गडचांदूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चव्हाण व कोरपण्याचे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बळाचा वापर केला. पप्पू देशमुख यांचे पाय पकडून पोलिसांनी त्यांना फरफटत नेले. तर बळजबरीने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलून गाडीमध्ये कोंबल्यामुळे अनेकांना इजा झाली. यानंतर सर्व आंदोलन कर्त्यांना गडचांदूर पोलिस स्टेशन येथे अटक करून ठेवण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत महसूल विभागाच्या सचिवांकडून ठोस आश्‍वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. वेळ आल्यास पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करून बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त व जन विकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला. त्यामुळे या आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला कोणते वळण मिळणार आणि प्रशासन यावर कोणते पाऊल उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

blank