मुंबई, दि. २२ : गोसीखुर्द उजव्या कालव्याचे २० दलघमी पाणी घोडाझरी तलावात सोडण्याकरिता कालव्याच्या ३४ कि.मी च्या ठिकाणी ८६.५६ कोटी रुपयांच्या उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचे निर्देश मंत्रालयात आयोजित बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दिले.चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी मध्यम प्रकल्पाची सिंचन क्षमता 3846 हेक्टर असून हा तलाव ब्रिटीश कालीन आहे. हा तलाव 1923 मध्ये पूर्ण झालेला आहे. तलावावर सध्या 5881 हेक्टर सिंचनाची मागणी असून त्यामुळे ताण निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर घोडाझरी संघर्ष समितीने गोसीखुर्द प्रकल्पातुन उपसा करून घोडाझरी तलावात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. ही प्रलंबित मागणी पूर्ण करावी यासाठी समितीतर्फे 27 ऑगस्ट रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीची त्वरित दखल घेत आजच्या बैठकीचे आयोजन केले.
गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या किमी 34 च्या ठिकाणी घोडाझरी मध्यम प्रकल्पाकरिता लागणा-या 20 दलघमी पाण्याकरिता उपसा सिंचन योजनेसाठी प्राथमिक अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत गोसीखुर्द उजव्या कालव्यावरून 22 मी. ची उचल करून जवळपास 18 किमी लांबीच्या उर्ध्वनलिकेद्वारे घोडाझरी तलावामध्ये पाणी सोडता येईल.या उपसा सिंचन योजनेतील पंपगृह, पंपसामुग्री, स्वीचयार्ड, उर्ध्वनलिका आदी कामांसाठी 86.56 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.
बैठकीला पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खा. अशोक नेते, आ. बंटी भांगडीया, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, घोडाझरी संघर्ष समितीचे संयोजक ईश्वरकुमार कामडी, रमेश पाटील बोरकर, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश कुर्वे, गोसीखुर्द प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. शेख, घोडाझरी कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मंडवार, जलसंपदा विभागाचे उपसचिव श्री. धरणे उपस्थित होते.





