भंडारा/तुमसर,दि.28ः पाच वर्षांपूर्वी राज्यावर दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते आता पाच लाख कोटींवर पोहचले आहे. प्रत्येक शासकीय विभागात दीड लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले.अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर मंचावर यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, श्री पांडे, जिया पटेल, मधुकर लिचडे, सीमाताई भुरे, डॉ अशोक ब्राह्मणकर, होमराज कापगते, जिल्हा परिषद सभापति प्रेम वनवे, रेखाताई वासनिक, अजय तुमसरे, जिल्हा महासचिव महेंद्र निंबार्ते, मुकुंद साखरकर, शिशिर वंजारी, रणवीर भगत, राजकपूर राऊत, शंकर तेलमासरे, हंसाताई खोब्रागडे, अनीक जमा पटेल, भूषण टेम्भूर्णे, धनराज साठवणे आदी उपस्थित होते.
माजी खासदार पटोले म्हणाले, भाजपने फक्त आश्वासनांवर जनतेचा कौल मिळविला, मात्र जनतेला आश्वासनाऐवजी कुठलीच परतफेड केली नाही. दुष्काळ सुरु असताना उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. मात्र आता भर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यात पुराचे थैमान असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त होते. भाजप शासनाच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या असंवेदनशील सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कार्य केले आहे. पेट्रोल व डिझेलच्या माध्यमातून दर महिन्याला तीन हजार ५०० कोटी रुपयांची लुट सामान्य जनतेकडून केली जात आहे. शेतकरी कर्जमाफी ही केवळ फार्स ठरली आहे. गरीबांच्या पैशांची उधळपट्टी सर्रास केली जात असून ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या काँग्रेस शासन काळातील आहेत. संविधान व लोकशाही व्यवस्था महत्वाची असताना भाजपचे खासदार मात्र शहीदांबद्दल अपमानकारक वक्तव्य करून जनभावना भडकावित आहेत. नोकरभरती बंद असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही देण्यात आली नाही. ३७० कलम हटविण्यावर भाजपची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. वीज व आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसची नीती स्पष्ट असून मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याने याबाबत जो निर्णय घेतला आहे तोच निर्णय काँग्रेसही घेईल असा सुतोवाचही त्यांनी केला.तर प्रचाराची भूमिका महत्वाची साकोली विधानसभा क्षेत्रातून आपली उमेदवारी आहे काय? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठांना याबाबत मी आपली भूमिका कळविली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातून लढविण्यापेक्षा प्रचार कार्यात सहभागी होणे महत्वाचे आहे. हीच भूमिका महत्वाची असून काँग्रेसला बळकट करणे हेच माझे ध्येय असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.”
२०१४ पासून जर फडणवीस सरकारने खरोखरच सिंचन, शेती, शहर विकास, दुष्काळ, बेरोजगारी निर्मुलन, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, विविध जातीसमुह यांच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी काही टक्के जरी काम केले असते तर भाजप सेना सरकारला राज्यात पंचतारांकीत सुविधा उपभोगत महाजनादेश यात्रेची नौटंकी करण्याची गरज भासली नसती. जनता आपल्या कारभारावर प्रचंड नाराज आहे हे या सरकारला पोलीस यंत्रणेकडून समजले आहे. त्यामुळेच हा अवाढव्य खर्च करून जनतेला भुलथापा देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अशा सरकारच्या भूलथापा व खोटारड्या सरकारला जनता बळी पडणार नाही व त्यांना त्यांची जागा दाखविणार असल्याचे पटले म्हणाले.
२०१४ च्या निवडणुकीपुर्वी भाजपाच्या नेत्यांनी या शिक्षकांना १०० टक्के अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेऊन सर्व विनाअनुदानीत शाळेचे शिक्षक भक्कमपणे भाजपाच्या पाठीशी उभे राहीले. मात्र पाच वर्ष पुर्ण झाले तरीही या शिक्षकांच्या मागण्या सरकारने पुर्ण केल्या नाही. अनेक वर्ष आंदोलन करुनही न्याय न मिळाल्याने गोंदीया जिल्हयातील केशव गोबडे तसेच नंदुरबार जिल्हातील जितेन्द्र पाटील या दोन शिक्षकांनी न्यायाच्या प्रतिक्षेत प्राण सोडला. राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या सरकारसाठी गंभीर विषय नाही. आता पवित्र काम करणा-या शिक्षकांचा मृत्यू सुध्दा सरकारसाठी गंभीर विषय राहीला नसल्याची टिका पटोले यांनी केली आहे. यावेळी प्रामुख्याने भूमेश्वर महावाडे, रविभूषण भुसारी, जनार्धन निंबार्ते, महेश कोराम, सुरेश मेश्राम, पूजा ठवकर, सचिन घनमारे, विशाल तिरपुडे, प्रिया खंडारे, उत्तम भागडकर, डॉ चंद्रशेखर निंबार्ते, मंगेश हुमणे, नरेश साकुरे, नाहिद परवेझ, केवळराम बांडेबुचे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष शाहीन मुन, सचिन फाले,भावना शेंडे,भारती निमजे, शालिनी मेश्राम, आशा गिऱ्हेपुंजे, प्रकाश देशमुख, लेकराम ठाकरे, नीलकंठ बागडे, योगेश सांगोडे, सुरेश बागडे, नितेश भेंडारकर, श्रीहरी भेंडारकर, अक्षय भिवगडे, कमल साठवणे, रोशन दहेलकर, साहिल मेश्राम, आकाश मेश्राम, पंकज भोंगाडे, आनंद चिंचखेडे, रोशन केसलकर, रजत रहांगडाले, शुभम सतीभस्की, रोहित माकडे, रोहित नागपुरे, शिवेश कडव, सोनू बागडे, मोनू गोस्वामी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रशांत वाघाये तर आभार प्रदर्शन अनीक जमा पटेल यांनी केले.





