मुंबई,दि.31ः- भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली असून या पदाची माळ पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. दिंडोशीचे आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सुनील प्रभू यांचीही पुन्हा पक्षाचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे.विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन सात दिवस उलटले, दिवाळीही होऊन गेली, तरी भाजपा- शिवसेना या दोन भावांमधील सत्तास्थापनेचा तिढा सुटायला तयार नाही. फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला, मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, मंत्रिपद वाटपाची समीकरणं याभोवतीच राज्याचे राजकारण फिरतेय. या दरम्यान, भाजपा आणि राष्ट्रवादीनं काल आपापले विधिमंडळ गटनेते निवडले. भाजपा आमदारांच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली, तर राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाली. म्हणजेच, भाजपाने सत्ता स्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री असतील आणि महाआघाडी विरोधी बाकांवर बसल्यास अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील.या बैठकीत सत्तास्थापनेबाबत काय चर्चा झाली किंवा शिवसेना नेतृत्व भाजपाच्या प्रस्तावांवर काय विचार करतय, याबाबत काही समजू शकलेले नाही.





