
भंडारा,दि.01ः- जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने दुधाचा पुरवठा करणार्या संस्थांचे मागील १६0 दिवसांचे १८ कोटींचे देयक अडविल्याने संस्था व दूध उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुधाचे देयक तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी शेकडो संस्था पदाधिकार्यांनी संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात जिल्हा दूध संघाला घेराव घातला. १0 दिवसात देयक न दिल्यास संघाला दुधाचा पुरवठा न करण्याचा इशारा दूध संस्था चालकांनी यावेळी दिला.
भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनासह पूरक व्यवसाय म्हणून दुधाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय नगदी पिकासारखा असून शेतकरी आपला प्रपंच चालवित असतो. जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय सुमारे ४00 कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १00 कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५0 दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात. तर दूध उत्पादक शेतकर्यांची संख्या सुमारे ३0 हजारांच्या घरात आहे. दूध उत्पादक शेतकर्यांसाठी वरदान ठरणार्या जिल्हा दूध संघाने अचानकपणे एप्रिल २0१९ पासून दूध संस्था व शेतकर्यांचे देयक अडवून ठेवले आहे. संस्थांचे देयक अडविल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या अनेक लहान संस्था बंद पडल्या आहेत. परंतु, त्यांचे देयक अदा करण्यात आले नाही. या संस्थांचे १६0 दिवस अर्थात १६ आठवड्यांचे देयक तातडीने देण्यात यावे, यासाठी दूध संघाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. अखेरीस, शनिवारी शेकडो संस्थाचालकांनी संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात दूध संघाला घेराव घालून देयक अदा करण्याची मागणी लावून धरली.





