गोरेगाव,दि.05ःवाघोबाच्या गावात चिमुकल्यांची भरली शाळा हे ऐकूण कदाचित सर्वाना आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडे जगवा, वाघ वाचवा या मुख्य उदेशाला घेऊन थेट वाघोबाच्या जंगलात जाऊन पर्यावरणाचे धडेच गिरविण्याचे कार्य २ डिसेंबर रोजी करण्यात आले. त्या शाळेचे नाव आहे, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार. ही शाळा गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येते. या प्रकाराच्या उपक्रमाची प्रसंशा सर्वच स्तरावरून करण्यात येत आहे.
‘झाडे जगवा, वाघ वाचवा’ असे आवाहन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना नेहमीच करण्यात येते. पण याची जाणीव व माहिती विद्यार्थ्यांना बालपणापासून दिली तर पर्यावरणाला संतुलित ठेवून वाघांना वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. याच उद्देशाला घेवून गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपारच्या वतीने ‘आमची शाळा-आदर्श शाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून २ डिसेंबर रोजी नागझिरा अभियारण्याच्या संरक्षित जंगल लगतच्या हिरवेगार जंगल परिसरात वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जंगल सफारी करविण्यात आली. या दरम्यान विविध औषधी युक्त वृक्षांची व प्राण्यांची माहिती वनविभागाच्या कर्मचार्यांकडून देण्यात आली. पर्यावरण टिकेल तर वाघ जिवंत राहील. या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्राण्यांची विष्ठा विद्यार्थ्यांना जंगलात दाखविण्यात आली आणि विष्ठेवरून प्राण्यांची कशी ओळख करता येईल, प्रत्यक्षात दाखविण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने हिरव्या पानांच्या पत्रावळी तयार केल्यात. झाडांच्या फांद्यावर झोके तयार करून आनंद घेतला. मोहफुलाच्या झाडाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे धडे गिरविले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी जंगल परिसरातच विशिष्ट व्यंजन तयार करून जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे जे व्यंजन बाजारात किंवा हॉटेलात पैशाने सुध्दा घेता येत नाही. म्हणजेच झाडीपट्टीचा आवडता पाऊणचार मालपोहे या मिष्ठान पदार्थ तयार केले. या उपक्रमाची माहिती गोरेगाव शिक्षण विभागाला मिळाली. माहिती मिळताच विषयतज्ज्ञ सुनिल ठाकूर, सतिश बावणकर, रहांगडाले जंगल पोहोचून विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणीत करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांव्दारा तयार करण्यात आलेल्या पानांच्या पत्रावळीत विविध व्यंजनांसह जेवणाचा आस्वाद घेवून करण्यात आला. हा अभिनव उपक्रम शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व वनविभागाच्या सहकार्याने करण्यात आला.





