24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ प्रत्येकांच्या मनात सैनिकांप्रती प्रेम, जिव्हाळा व आदर असावा – रविंद्र जगताप

प्रत्येकांच्या मनात सैनिकांप्रती प्रेम, जिव्हाळा व आदर असावा – रविंद्र जगताप

0
47

भंडारा, दि. 7 : सिमेवर प्राणाची बाजी लावून देश वासियांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती व त्यांच्या कुटूंबियांप्रती समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या मनात प्रेम, जिव्हाळा व आदर असावा. सैनिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येक भारतीयाने सढळ हाताने योगदान देवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, तहसिलदार धनंजय देशमुख, मलिक विराणी, माजी फ्लाईट लेफ्टनंट तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहूण्यांनी ध्वजदिन निधी देवून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

लहानपणी सैनिकांच्या पोशाखाप्रती आदर निर्माण झाला, आपण सैनिक व्हावे असे वाटले, त्यातूनच सैनिकाप्रती काही करण्याची तळमळ मनात निर्माण झाली. महसूल विभागात असतांना माजी सैनिक असलेल्या कारकूनाकडून त्यांनी केलेल्या सैन्यातील अनुभव ऐकले. त्यामुळेच शिस्त कशी असावी हे कळाले. सैनिकाप्रती प्रेम, जिव्हाळा व आदर निर्माण झाला, असे रविंद्र जगताप म्हणाले.  याच भावनेतून माजी सैनिकांना सहकार्य करा. माजी सैनिकांना शासनातर्फे जी मदत मिळते ती तुटपूजी आहे, त्यात वाढ करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

सैनिकांना सहकार्य करा, इतर देशात जसे सैनिकांचा सन्मान होतो त्याप्रमाणेच आपणही त्यांचा सन्मान केला पाहिजे. सैनिक जगला तरच आपण जगू, असे तहसिलदार धनंजय देशमुख यांनी सांगितले. घरातील कर्ता व्यक्ती मृत्यु पावल्यास परिवारास मानसिक व आर्थिक आघात पोहचतो. अशा वेळी माजी सैनिकांच्या परिवाराची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी, असे तहसिलदार मलिक विराणी यांनी सांगितले.

प्रारंभी शहिदांच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विरमाता विमल केवलदास बन्सोड, सिता भागवत माटे, जनाबाई सदानंद मडामे व विरपत्नी उर्मिला गणपत तितिरमारे, जाती हिरामन सिंद्राम यांचा मान्यवरांच्या भेटवस्तु, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिकाचे पाल्य भूषण चंद्रभान कारेमोरे यास 10 हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. सरीता लूटे यांनी 1 हजार 111 चा धनादेश ध्वजदिन निधीसाठी सुपूर्द केला.

प्रास्ताविकात धनंजय सदाफळ यांनी सशस्त्र सेना ध्वजदिनाचे महत्व सागून जिल्हयाला 2018 करीता दिलेला इंष्टांक 28 लक्ष 45 हजार 920  वेळेच्या आत पूर्ण केल्याचे सांगितले. यावर्षी ध्वजदिननिधी संकलनाचे जिल्हयाला दिलेले उद्दिष्ट 28 लक्ष 45 हे सहज पूर्ण करु अशी ग्वाही दिली.जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच अवलंबितांचे कोणत्याही कार्यालयाकडे प्रकरणे असतील तर त्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयाकडे एकत्रितपणे पाहेचवावेत. तसेच माजी सैनिकांच्या चरितार्थ 6 हजार, शालेय मदत 68 हजार, व्यावसायिक मदत 6 लाख, मंतिमंद पाल्यास 21 हजार 600 रुपये, स्वंयसहाय्यता मदत 3 लाख रुपये, अत्यंविधी, मुलींचे लग्न आदिंसाठी निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लालबहादूर विद्यालय भंडारा येथील विद्यार्थींनी स्वागत  व सैनिकांच्या प्रती गित गायन करुन उपस्थितांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे संचलन मुकूंद ठवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुधाकर लुटे यांनी मानले. या कार्यक्रमास विरमाता, विरपत्नी, माजी सैनिक, त्यांचे पाल्य तसेच अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.