वर्धा, 14 जून -; कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कारागृहातील अनेक बंदींना सोडण्यात आले. नव्याने आलेल्या बंदींना थेट कारागृहात टाकणे शक्य नाही. त्यामुळे नियमानुसार त्यांची कोरोना चाचणी करून त्याला 14 दिवस विलगीकरणात ठेवणे अनिवार्य आहे. यातूनच वर्धा प्रशासनाने येणार्या बंदींसाठी क्वारंटाईन कारागृहाची निर्मिती केली आहे. कदाचित राज्यातील हे पहिलेच क्वारंटाईन कारागृह असावे. या क्वारंटाईन कारागृहात एका वेळी 50 बंदी राहणार आहेत. यात 25 महिला आणि 25 पुरुषाचा समावेश आहे. याकरिता जिल्हा क्रीडा संकुलाती दोन मोठ्या खोल्या वापरण्यात येणार आहेत. याकरिता जिल्हा परिषदेच्या बंद असलेल्या शाळांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, यातून बंदींच्या पलायनाचा धोका निर्माण झाला आहे. या क्रीडा संकुलाच्या खोल्यांना जिलव्हाधिकार्यांनी मंजुरी दिली आहे. या खोल्यांच्या दुरुस्तीच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात कारागृहातील गर्दी टाळण्याकरिता शासनाच्या वतीने क्षमतेपेक्षा अधिक बंद असलेल्या जिल्हा कारागृहातून अडीचशेच्या आसपास बंदींना सोडले आहे. सध्या जिल्हा कारागृहात क्षमतेच्या तुलनेत बंदी आहेत. नव्यने येणार्या बंदीची कोरोेना चाचणी करूनच त्याला कारागृहात परवानगी देण्याच्या सूचना आहेत. परंतु नव्याने येणार्या बंदींना कारागृहात विलगीकरणात ठेवणे शक्य नसल्याचे पुढे आले. यातूनच या क्वारंटाईन कारागृहाची संकल्पना उदयास आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तसा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकार्यांना देण्यात आला., जिल्हाधिकार्यांनी याची चौकशी करून तो प्रस्ताव मंजूर केला आहे.





